

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आपण गेली अनेक वर्षे विकासाच्या नव्हे तर जाती-धर्माच्या नावावर लोकप्रतिनिधी निवडून देतो. त्यामुळे रस्त्यांवर अनेक वर्षे खड्डे पडतात, लोक त्या खड्ड्यांमधून जातात-येतात. जोपर्यंत आपला राग मतपेटीत उतरत नाही, तोपर्यंत कोणतेच प्रश्न सुटणार नाहीत, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केले. हडपसर येथे पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, जाती-धर्माच्या नावाखाली जनता लोकप्रतिनिधी निवडून देते.
रस्त्यावरील खड्डे आणि इतर प्रश्न निर्माण करणार्या लोकांना जनता मतदान करून निवडून आणते. मनसेने आजवर अनेक प्रश्नांवर आंदोलने केली. मात्र परिस्थिती बदलली नाही. जोपर्यंत लोकांचा राग मतपेटीतून उतरत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत. जे महाराष्ट्राचे नुकसान करतात, त्यांना लोक निवडून देतात, याचे आश्चर्य वाटते.
शहरातील खड्डड्यांच्या विरोधात मनेसेने 16 ठिकाणी आंदोलने केली. सर्वच आंदोलनांमध्ये मोडतोड करण्याची गरज नाही. आपण ज्यांच्यासाठी आंदोलन करतोय, त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. आंदोलनामुळे सरकारचे डोळे उघडतील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
तसेच निवडणुकांच्या प्रश्नावर ते म्हणाले, आम्हाला वाटेल तेव्हा निवडणुका घेऊ, या विचारात राज्यकर्ते आहेत. कायदा नावाची गोष्टच राहिली नाही. ज्यांच्या हातामध्ये या गोष्टी आहेत, त्यांना कोणी प्रश्नच विचारत नाही. शहरे वाढत आहेत, ती कशी वाढत आहेत, याचे कोणाला काही घेणे-देणे नाही. केवळ मतदार वाढवा आणि निवडून या, बाकी गेले तेल लावत. टाऊन प्लॅनिंग काय असते हे इंग्रजांनी दाखवून दिल्याचेही ठाकरे यांनी नमूद केले.
हेही वाचा