‘त्या’ धर्मांध माथेफिरूवर कारवाई करा; नारायणगाव पोलिसांना मुस्लिम समाजाचे निवेदन

‘त्या’ धर्मांध माथेफिरूवर कारवाई करा; नारायणगाव पोलिसांना मुस्लिम समाजाचे निवेदन

नारायणगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कोळगावथडी (ता. कोपरगांव, जि. अहमदनगर) येथे एकाने मुस्लिम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ कुरआन शरीफ फाडला. त्याच्या निषेधार्थ नारायणगाव या ठिकाणी मुस्लिम समाजाने एकत्रित येऊन नारायणगाव पोलीस स्टेशनला जमत संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना दिले. यावेळी मोठ्या संख्येने नारायणगाव शहरातील मुस्लिम बांधव तसेच मस्जिदमधील इमाम साहेब उपस्थित होते.

या धर्मांध व्यक्तीने केलेल्या कृतीमुळे इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुरआन शरीफ यांची बिटवना होऊन संपूर्ण जगातील मुस्लिम समाजाच्या भावनांना ठेच पोहचली आहे. आपल्या भारत देशात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, एकत्र सण साजरे करतात. अशा परिस्थितीत या व्यक्तीने धार्मिक तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने ही कृती केल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई करावी, जेणेकरून सर्व धर्मांमध्ये जातीय सलोखा कायम राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निवेदन स्वीकारताना नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना आवाहन केले की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथे घडलेल्या प्रकाराबाबतचे निवेदन वरिष्ठांपर्यंत पोहोचवले जाईल. नारायणगाव या ठिकाणी हिंदू-मुस्लिम यांच्यातील जातीय सलोखा कायम आहे व तो तसाच अबाधित ठेवावा. दुसरीकडे घडलेल्या घटनेमुळे स्थानिक पातळीवर कुठलेही अनुचित प्रकार करू नका; अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करू नका, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा, जर कोणी व्यक्ती जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news