नवी सांगवीत रस्त्यावर जनावरे ‘मोकाट’ | पुढारी

नवी सांगवीत रस्त्यावर जनावरे ‘मोकाट’

नवी सांगवी(पुणे) : येथील मुख्य चौकात गेली काही दिवस मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. सध्या पाच ते दहा गटगटाने मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली असतात किंवा बिनधास्तपणे रस्त्यांवर मधोमध उभी असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असून, अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

वाहतूककोंडीत भर

सांगवीमध्ये महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सगळीकडे रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे येथील रस्ते निसरडे होत आहेत. येथील नागरिक व्यवसाय करण्यासाठी, नोकरीसाठी, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी चौकातील मुख्य रस्त्यावरून बाजारपेठेत जात असतात. चाकरमानीदेखील सकाळी व संध्याकाळी ये-जा करीत असतात.

अशावेळी भर चौकात, मुख्य रस्त्यावर गटगटाने मोकाट जनावरे पहावयास मिळत आहेत. ही जनावरे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना तसेच वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करीत आहेत. पायी चालणार्‍या नागरिकांना तसेच वाहतुकीला मुळीच घाबरत नाहीत. येथील मोकाट जनावरांना नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तर उलट अंगावर धावून येतात. त्यामुळे वाहनचालकांना, पायी चालणार्‍यांना येथील चौकातून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. अशा वेळी अपघात घडून येण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते.

अपघाताची भीती

येथील भर चौकातील रस्त्यावर सतत वाहतुकीची व नागरिकांची दिवसभर सतत वर्दळ सुरू असते. त्यातच भर चौकात रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला मोकाट जनावरांचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला, दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते व लहान मुलांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारे कृष्णा चौक, साई चौक, सृष्टी चौक, रामकृष्ण चौक आदी परिसरात मोकाट जनावरे सकाळ, दुपार, संध्याकाळ कळपाने रस्त्याच्या मधोमध बिनधास्तपणे उभी, बसलेली पहावयास मिळत आहेत. महापालिकेने अशा मोकाट जनावरांच्या तावडीतून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी येथील नागरिक, भाजीविक्रेते, दुकानदारांकडून करण्यात येत आहे.

रस्त्यावरून जात असताना मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध तर काही जनावरे रस्त्याकडेला उभी राहत असल्याने जीव मुठीत धरून चालावे लागते. हे नित्याचेच होत चालले आहे. यावर संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करून रस्ता सुरळीत करून द्यावा.

– सागर परदेशी,
सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा

लोकवस्तीमध्ये कचरा संकलन केंद्र नकोच! आमदार महेश लांडगे

देहूगाव : एकाच जमिनीची दोघांना विक्री

चिखलीत वाढल्या गढूळ पाण्याच्या तक्रारी

Back to top button