धक्कादायक ! बारामतीमध्ये एकाच रात्रीत चौदा सदनिका फोडल्या | पुढारी

धक्कादायक ! बारामतीमध्ये एकाच रात्रीत चौदा सदनिका फोडल्या

बारामती : पुढारी वृत्तसेवा  :  शहरातील देसाई इस्टेट व परिसरात गुरुवारी (दि. 17) पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सुमारे 14 सदनिका फोडत येथून 22 तोळ्यांहून अधिक दागिने लंपास करण्यात आले. यातील बहुतांश सदनिका बंद होत्या. शहरात गेल्या आठवड्यापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. वाढत्या चोर्‍या रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे. गुरुवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान हा प्रकार घडला.

देसाई इस्टेट व जिल्हा क्रीडा संकुलालगतच्या पाच अपार्टमेंटमधील सदनिका चोरट्यांनी लक्ष्य केल्या. पाच ते सहा जणांच्या टोळीने मोटारीतून येत सदनिकांचे कुलूप, कडी-कोयंडे तोडून टाकत दागिन्यांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे गत आठवड्यात याच परिसरात चोर्‍यांचे दोन प्रकार घडले होते. शहरातील अशोकनगर भागालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. या घटनेमुळे बारामती शहरातील नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे.

पहाटे चोरट्यांनी या भागात अक्षरश: हैदोस घातला. घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे आदींनी येथे भेट देत पाहणी केली. ज्या सदनिकांमध्ये चोर्‍या झाल्या, त्यातील बर्‍याचशा सदनिका बंद होत्या. एकाच सदनिकेतून 22 तोळ्यांहून अधिक दागिने चोरीला गेले आहेत. अन्य सदनिकांमधूनही दागिने, रोकड चोरीला गेली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.

पोलिस यंत्रणा ठरतेय कूचकामी
शहरातील सातव चौकात नुकतीच सात लाखांचे दागिने व रोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे. देसाई इस्टेट परिसरात गत आठवड्यात दोन ठिकाणी चोर्‍यांचे प्रकार घडले होते. त्यानंतर शहरात पुन्हा चोर्‍यांचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वाढत्या चोर्‍या रोखण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळत आहे.

चोरी झालेल्या ठिकाणी भेट दिली. तेथील नागरिकांशी चर्चा केली. यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहेत, शिवाय गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीचा क्रमांक मिळाला आहे. त्या आधारे लवकरात लवकर आरोपींना गजाआड करू.
                                    – आनंद भोईटे, अप्पर पोलिस अधीक्षक, बारामती.

हेही वाचा  :

China President Xi Jinping | चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १५ व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार

अहमदनगर : ‘गुरुजी मल्टिस्पेशालिटी’च्या निधीचा मार्ग खडतर!

Back to top button