पुणे शहरातला पाऊस 40 टक्क्यांनी घटला | पुढारी

पुणे शहरातला पाऊस 40 टक्क्यांनी घटला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  यंदा मान्सूनच्या हंगामात ऑगस्टचा दुसरा आठवडा संपला तरी शहरात फक्त 257.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिवाजीनगर वेधशाळेच्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल 40 टक्के पावसाची घट आहे. यंदा अल निनोचा प्रभाव शहरावर झाला असून, घाटमाथ्यापेक्षाही शहरात वार्‍याचा वेग सतत कमी असल्याने मोठा पाऊस यंदाच्या पावसाळ्यात झालाच नाही. शहरात 17 ऑगस्टपर्यंत सुमारे 400 ते 430 मि.मी. पाऊस होतोच, तर 31 ऑगस्टपर्यंत ही सरासरी 550 ते 600 मि.मी.वर जाते. मात्र, यंदा शहरात पाऊस इतक्या धीम्या गतीने झाला की, एकही दिवस 24 तासांत 22 मिलिमीटरच्या वर पाऊस झाला नाही.

यंदा मान्सून 25 जून रोजी शहरात दाखल झाला. त्यानंतर वार्‍याचा वेग शहरात सतत कमी राहिल्याने रिमझिम पाऊस पडत राहिला. जुलैमध्ये मान्सून हंगामातील 60 ते 80 टक्के पाऊस पडतो. तो यंदा शहरात पडलाच नाही. त्यामुळे शहर सरासरीत मागे पडले. मात्र, अजून ऑगस्टचा शेवटचा आठवडा व संपूर्ण सप्टेंबर महिना बाकी आहे. त्यामुळे ही सरासरी भरून निघेल अशी आशा आहे.

                                  – अनुपम कश्यपी, हवामान विभाग प्रमुख, पुणे

अनेक निरीक्षणांचा अभ्यास
जून ते ऑगस्टदरम्यान शहरात किती पाऊस पडतो, याचा ताळेबंद पुणे वेधशाळेने मांडला. यात त्यांनी 1 हजार 860 प्रकारची निरीक्षणे नोंदवली आहेत. ही निरीक्षणे जून 2018 ते 13 ऑगस्ट 2023 पर्यंतची आहेत. या निरीक्षणानुसार शहरात दररोज 61.6 मि.मी. पाऊस पडतो. मात्र, यंदा पावसाने नीचांकी पातळी गाठली आहे. जून ते ऑगस्टदरम्यान एकही दिवस 22 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला नाही.

2019 मध्ये सर्वांत मोठा पाऊस
पुणे वेधशाळेने केलेल्या अभ्यासानुसार शहरात आजवर सर्वांत मोठा पाऊस 2019 या वर्षात झाला आहे. शहरात वर्षातील सरासरी 750 ते 1100 मि.मी. इतकी आहे. तशा पावसाच्या नोंदी आहेत. मात्र, 2019 मध्ये 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत शहरात 1803.5 मि.मी. पावसाची मान्सूनच्या हंगामात नोंद झाली. आजवरचा हा विक्रमी हंगाम ठरला आहे. पुणे जिल्हा सरासरीत उणे 17 इतका मागे दाखवत असला तरीही शिवाजीनगर हा भाग पावसाच्या बाबतीत प्रमाण म्हणून मानला जातो. तेथे जेवढा पाऊस होतो तेवढा पाऊस शहरात होतो, असे गृहीत धरले जाते.

शहरात वार्‍याचा वेग सतत कमी
पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांच्या मते यंदा शहरात वार्‍याचा वेग सतत कमी राहिला आहे. बाष्पयुक्त वारे वाहून नेण्यासाठी वार्‍याचा वेग किमान 30 ते 35 नॉट इतका असावा लागतो. मात्र, तो शहरावर यंदा सतत 15 ते 20 नॉट इतकाच आहे.

हेही वाचा :

गुंडांतील टोळीयुद्धाने पुणे शहर हादरले !

शिवाजीनगरहून-नाशिकसाठी ई-शिवाईच्या नव्या 18 बस

Back to top button