गुंडांतील टोळीयुद्धाने पुणे शहर हादरले ! | पुढारी

गुंडांतील टोळीयुद्धाने पुणे शहर हादरले !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मंगला चित्रपटगृहाजवळ बुधवारी रात्री टोळी युद्धातून गुंडाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच दुसर्‍या दिवशी गुरुवारी रात्री वानवडी परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात एका तडीपार गुंडाचा खून करण्यात आला. दुसर्‍याची बोटे छाटण्यात आली, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या थरारक घटनेने वानवडी परिसरात तणाव असून, पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. अजीम वजीर शेख ऊर्फ अंत्या (रा. महंमदवाडी) असे खून झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी काही संशयितांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

ही घटना महंमदवाडी येथील गुलामअलीनगर येथील गल्ली नं. तीनमध्ये गुरुवारी (दि. 17) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजीम शेख हा सराईत गुंड असून, त्याला तडीपार करण्यात आले आहे. असे असताना तो महंमदवाडी येथे होता. एकमेकांच्या शेजारी राहणार्‍यांमध्ये पूर्वीपासून वाद आहे. एकमेकांना धक्का लागल्याने त्यांच्यात बुधवारी वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी या दोन कुटुंबांतील लोक गुरुवारी रात्री जमले होते. त्या वेळी वादावादीचे पर्यवसान भांडणात झाले. त्यात दुसर्‍या गटातील लोकांनी कोयता व तीक्ष्ण हत्याराने अजीमवर सपासप वार केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. अल्ताफ याची बोटे छाटली गेली. तर, आणखी एकाच्या डोक्यात वार करण्यात आले.

टोळीयुद्धाचे प्रकार वाढले
शहरात दोन दिवसात दोन गुंडांचा खून झाला आहे. ताडीवाला रोडवरील दोन टोळ्यांमधील गुंडांच्या वादातून नितीन मस्के याचा खून झाला. प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी मंगला चित्रपटगृहासमोर त्याच्यावर कोयत्याने वार केले. बुधवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. त्याच्या दुसर्‍या दिवशी गुरुवारी वानवडीत अजीम वजीर शेख ऊर्फ अंत्या याचा खून झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :

नाशिकच्या म्हसरूळला तलाठी परीक्षेचा पेपर फुटला, संशयित पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर : सराफ व्यावसायिक अपहरण; ८ जणांना अटक

Back to top button