भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीच्या आवारातील झाडांवर कुर्‍हाड | पुढारी

भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीच्या आवारातील झाडांवर कुर्‍हाड

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : भोसरी, एमआयडीसी भागातील ब्लॉक एस टू येथील एका खासगी बंद कंपनीच्या आवारातील जुनी व मोठी झाडी तोडण्यात आली आहेत. तसेच, पदपथावरीलही झाडे तोडण्यात आली आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाहीत. हा प्रकार बुधवारी (दि.16) सायंकाळी उघडकीस आला. या प्रकरणी वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ व सहकार्‍यांनी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे तक्रारी केली आहे. मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या वृक्ष कत्तलीचा सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारीत करण्यात आला. त्यामुळे वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

वृक्षतोड करून झाडांची तस्करी केली जात असल्याचा आरोपही राऊळ यांनी केला आहे. ती तोडलेल्या झाडांची लाकडे (एमएच 14 व्ही 4614) क्रमांकाच्या ट्रकमधून नेण्यात येत होती. या तक्रारीनंतर खडबडून जागे झालेल्या उद्यान विभागाने भोसरी एमआरडीसी पोलिस ठाण्यास रात्री उशीरा विनापरवाना वृक्ष तोड करणार्‍या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. तो लाकडे भरलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. पंचनाम्यानुसार कंपनीच्या आवारातील मोठी दोन झाडे व पदपथावरील 6 झाडे तोडण्यात आल्याचे नमूद केले आहे.

विनापरवाना झाडे तोडल्यास फौजदारी करणार

विनापरवाना वृक्ष तोड करणार्‍या नागरिक व संस्थांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यात कोणाला अभय दिले जाणार नाही, असे महापालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांनी सांगितले.

हेही वाचा

करंजी : गतिमान नव्हे, अवमेळाचे सरकार : आमदार तनपुरे

नाशिक विभागात जामखेड ठरला पहिला ‘ओडीएफ’ प्लस तालुका

छत्तीसगडच्या जंगलातील नक्षल शिबिर उद्ध्वस्त, स्फोटकांसह साहित्य जप्त

Back to top button