करंजी : गतिमान नव्हे, अवमेळाचे सरकार : आमदार तनपुरे | पुढारी

करंजी : गतिमान नव्हे, अवमेळाचे सरकार : आमदार तनपुरे

करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांच्या विजेच्या प्रश्नांसंदर्भात आघाडी सरकारने एक योजना आणली होती, ती या गतिमान सरकारने बंद केली. ती मात्र तेही मंत्र्यांना माहीत नव्हते; मग हे सरकार राज्याचे मंत्री चालवतात की प्रशासनाचे अधिकारी? असा सवाल आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला. हे सरकार गतिमान नव्हे, तर अवमेळ असलेले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार तनपुरे यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी आडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन संजय चांडे होते. आमदार तनपुरे म्हणाले, गतिमान सरकार जाहिरातीवर कोट्यवधी रुपये उधळीत आहे; मात्र या गतिमान सरकारला एक वर्ष पूर्ण होऊन गेले तरी जे शेतकरी वेळेवर कर्ज फेड करतात त्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देता येईनात. एका वर्षात अतिवृष्टीचे पैसेसुद्धा शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करेनात.

शेतकर्‍यांना दिवसा वीज देता येईना. नवीन सबस्टेशन, डीपी देण्याची एक योजना आघाडी सरकारने सुरू केली होती. या योजनेत दोन हजार कोटी रुपये शिल्लक असताना ही योजनाच या सरकारने बंद केली. अशा अनेक योजनांची माहिती मंत्र्यांनाच नसते. अशा बेमालुम मंत्र्यांच्या वतीने अधिकारी माहिती देतात. त्यामुळे हे गतिमान सरकार नेमके कोण चालवीत आहे? पंचायत समिती सदस्य राहुल गवळी, भागिनाथ गवळी, जालिंदर वामन, एकनाथ झाडे, अंबादास डमाळे, उद्धव दुसंग, सुनील कराळे, आबासाहेब अकोलकर, जगन्नाथ लोंढे, सुरेश बर्फे आदी उपस्थित होते.

दोघात तिसरा येणार?

मतदारसंघामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने या गतिमान सरकारची जाहिरात एका शाळेवर पाहिली. त्यात दोन उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. आता पुढच्या वर्षी आणखी एखाद्या उपमुख्यमंत्र्याचा फोटो लावण्याची वेळ या सरकारवर आली तर नवल वाटायला नको, असा चिमटाही आमदार तनपुरे यांनी या वेळी काढला.

हेही वाचा

रोजगार निर्मितीत नगर प्रथम : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील;

आंबेगाव, जुन्नर, शिरूर पूर्व भागात चारा छावण्या सुरू करा : दिलीप वळसे पाटील

छत्तीसगडच्या जंगलातील नक्षल शिबिर उद्ध्वस्त, स्फोटकांसह साहित्य जप्त

Back to top button