नाशिक विभागात जामखेड ठरला पहिला ‘ओडीएफ’ प्लस तालुका | पुढारी

नाशिक विभागात जामखेड ठरला पहिला ‘ओडीएफ’ प्लस तालुका

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) योजनेच्या माध्यमातून गावे स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याची विशेष मोहिम सुरू आहे. यामध्ये वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामाच्या माध्यमातून गावे अधिकाधिक स्वच्छ करण्यावर शासनाचा भर आहे. यापूर्वी सर्व गावे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली होती. मात्र केवळ शौचालय असणे आणि त्याचा वापर करणे एवढ्यावर न थांबता गावागावात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे शासनाच्या माध्यमातून करण्यात आली आहेत.

सर्व गावातील सांडपाणी उघड्यावर न सोडता शोषखड्ड्यात सोडण्यात येत आहे. तसेच घनकचरा हा घंटागाडीच्या माध्यमातून वाहून नेऊन कंपोस्ट खड्ड्यात टाकण्यात येत आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. रोगराईला आळा बसतो. परिणामी चांगले आरोग्य आणि राहणीमान हे शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी मदत होणार आहे. सध्या ही सर्व कामे झाल्यानंतर गावे ओडिएफ प्लस घोषित करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये 15 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्रातील 18 तालुके ओडिएफ प्लस घोषित करण्यात आले असून यामध्ये नाशिक विभागात जामखेड हा पहिला ओडिएफ प्लस तालुका घोषित करण्यात आला आहे.

जामखेड तालुक्याने यापूर्वीही प्रधानमंत्री आवास योजना, रोजगार हमी योजनेत विभागात अव्वल येण्याचा बहुमान पटकावला आहे. आता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नाशिक विभागात पहिला ओडिएफ प्लस तालुका बनण्याचा बहुमानही जामखेडला मिळाला आहे. मागील दोन वर्षांपासून सातत्याने जामखेड पंचायत समिती विविध कामे आणि उपक्रमाच्या माध्यमातून नावलौकिक मिळवत आहे. सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नाचा स्तर वाढविण्यासाठी मदत होत आहे याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. खा. सुजय दादा विखे, आ. रोहित दादा पवार, आ. राम शिंदे यांनी पंचायत समितीच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रकाश पोळ व त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

प्रत्येक योजनेत अव्वलसाठी प्रयत्न ः पोळ

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सततचा पाठपुरावा, लोकप्रतिधींचे वेळोवेळी मिळालेले सहकार्य आणि पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, स्वच्छाग्रही यांनी अहोरात्र मेहनत घेतल्याने हे शक्य झाले. जामखेड तालुक्याला प्रत्येक योजनेत/उपक्रमात अव्वल ठेवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले.

हेही वाचा

आंबेगाव, जुन्नर, शिरूर पूर्व भागात चारा छावण्या सुरू करा : दिलीप वळसे पाटील

छत्तीसगडच्या जंगलातील नक्षल शिबिर उद्ध्वस्त, स्फोटकांसह साहित्य जप्त

सातगाव पठार भागात बटाटा पीक फुलोर्‍यात

Back to top button