मंचर : चांडोली तुकानाना चौक ते पिंपळगाव रस्ता खड्डेमय | पुढारी

मंचर : चांडोली तुकानाना चौक ते पिंपळगाव रस्ता खड्डेमय

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील चांडोली तुकानाना चौक-पिंपळगाव (खडकी) या दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्काळ खड्डे न बुजवल्यास शिवसेनेच्या युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी आंदोलनाचा इशारा दिला. तुकानाना चौक पिंपळगाव (खडकी) ते निरगुडसर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत खराब झाला असून, ये-जा करणार्‍या प्रत्येक नागरिकाला व शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात मोठ्या खड्ड्यात पाणी साचून राहिल्यामुळे वाहतूक करणार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिंपळगाव (खडकी) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात होण्याचे प्रकार या रस्त्यावर वारंवार घडत आहेत. या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत 70 लक्ष रुपये निधी मंजूर असूनही पावसाळ्याचे कारण पुढे करत पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने दिवाळीनंतर काम केले जाणार असल्याचे सांगून टाळाटाळ केली जात आहे.

हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी दिला आहे.

या वेळी पिंपळगाव (खडकी) गावचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामदास गंगाराम बांगर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, युवा सेना तालुका उपप्रमुख राहुल पोखरकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल पोखरकर पाटील, अशोक बांगर, विठ्ठल पोखरकर माडीवाले, सुरेश बांगर, युवा नेते श्रीकांत पोखरकर, अमोल पोखरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा

सांगवी : सोमंथळी बॅरेज ठरतोय शेतकर्‍यांना वरदान

नानगाव : भीमा नदीपट्ट्यात वाढताहेत बिबट्यांची कुटुंबे

नवी सांगवी : अग्निशमन केंद्राअभावी वेळेत मिळेना मदत

Back to top button