पुणे : ’पुरुषोत्तम’ची प्राथमिक फेरी उद्यापासून | पुढारी

पुणे : ’पुरुषोत्तम’ची प्राथमिक फेरी उद्यापासून

पुणे : कुठे वेशभूषेची तयारी झाली आहे, तर कुठे नेपथ्याविषयीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे…तर काही ठिकाणी अंतिम सराव सुरू आहे…ही तयारी आहे पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठीची. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणार्‍या या स्पर्धेची प्राथमिक फेरी बुधवारपासून (दि. 16) रंगणार आहे. प्राथमिक फेरी 16 ते 30 ऑगस्ट या कालावधीत होत असून, स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी जल्लोषात तयारी केली आहे. या स्पर्धेतील 51 संघांपैकी 42 संघांच्या नव्या कोर्‍या संहितेवरील एकांकिका स्पर्धेत पाहायला मिळणार असून, तरुण कलाकारांनी संहितेवर भर दिला आहे.

आव्वाज कुणाचा…. महाविद्यालयाचा… या घोषणेने भरत नाट्य मंदिराचा परिसर दुमदुमून जाणार आहे. महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58 व्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतील करंडक यंदा पटकावणारच, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. प्राथमिक फेरीची सुरुवात मराठवाडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ”चिकन खर्डा विथ गार्लिक नान” या एकांकिकेने होत आहे. रोज सायंकाळी पाच वाजता एकांकिकांच्या सादरीकरणाला सुरुवात होणार असून, प्राथमिक फेरीत रोज तीन महाविद्यालयांच्या एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. तर, रविवारी (दि. 20 आणि दि. 27) स्पर्धा दोन सत्रांत सकाळी 9 आणि सायंकाळी 5 या वेळांमध्ये होणार आहे. 30 ऑगस्ट रोजी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ”सुरेख चालंलय आमचं” या एकांकिकेने प्राथमिक फेरी संपणार आहे. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड केली जाणार असून, स्पर्धेची अंतिम फेरी 9 आणि 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.

यंदा पुरुषोत्तम करंडक पटकावणारच

मागील वर्षी स्पर्धेतील सांघिक विभागातील प्रथम क्रमांकाचा पुरुषोत्तम करंडक हा कोणत्याच महाविद्यालयीन संघाला पटकावता आला नाही. पण, यंदा पुरुषोत्तम करंडक पटकावण्यासाठीची जिद्द विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळत असून, पुरुषोत्तम करंडकाला साजेसे सादरीकरण करून करंडक पटकावण्यासाठी विद्यार्थी सज्ज आहेत. विद्यार्थी एकांकिका सादरीकरणावर मेहनत घेत आहेत.

ऑनलाईन तिकीट विक्रीला प्रतिसाद

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची तिकिटे मिळत नसल्यामुळे प्रेक्षकांना स्पर्धेच्या आनंदाला मुकावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्रीय कलोपासकने यंदाच्या वर्षीपासून प्राथमिक फेरीची तिकिट विक्री ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाट्यगृहातील काही जागा राखीव ठेवल्या होत्या. ऑनलाईन तिकीट विक्रीला प्रतिसाद मिळाला आहे.

हही वाचा

तळेगाव स्टेशन : वातावरणातील बदलामुळे भातपीक धोक्यात 

कोल्हापूर हायकर्स तर्फे कारगिलमध्ये ध्वजवंदन

नागपूर : गडचिरोली पोलिसांना सर्वाधिक पोलिस पदके, मात्र नक्षलवादविरोधातील संघर्ष संपलेला नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस

Back to top button