Leopard Attack : भोंडवे वस्तीत शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला | पुढारी

Leopard Attack : भोंडवे वस्तीत शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

वढू बुद्रुक; पुढारी वृत्तसेवा : वाजेवाडी येथील भोंडवे वस्ती (ता. शिरूर, जि. पुणे) मध्ये आज सकाळी बिबट्याने एकावर प्राणघातक हल्ला (Leopard Attack) केला. बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नारायण चिमाजी सरडे असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

वाजेवाडी, वडू बुद्रुक, आपटी, पिंपळे जगताप, या गावांमधील परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याच्या वावर वाढला आहे. आज सकाळी 8 वाजता वाजेवाडीमधील भोंडवे वस्ती येथील आपल्या शेतामध्ये सरडे हे चक्कर मारण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेतामधील कॅनॉलच्या बाजूने दाट शेती असणाऱ्या उसामधून अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.

त्यामध्ये त्यांचा डोक्याला आणि गालाला गंभीर जखमा (Leopard Attack) झाल्या. शेजारील दोन तीन शेतकरी आवाज करत धावत आल्याने बिबट्या उसामध्ये पळून गेला, सरपंच  मोहन वाजे आणि इतरांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कोरेगाव भिमा येथील हॉस्पिटल येथे नेण्यात आले.

वन खात्याचे बी एल दहातोंडे, आनंदराव हरगुडे, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला. ग्राम सुरक्षेच्या कॉलिंग यंत्रणेमुळे तातडीने ही बातमी परिसरात पसरली. त्यामुळे लोक सावध झाले, वाजेवाडी,वडू बुद्रुक गावांमधील परिसरामध्ये यापूर्वीही बिबट्याचा वावर दिसून आला होता.

बिबट्याचा मानवी वस्तीत वावर आणि आता अचानक बिबट्याचा प्राणघातक हल्ला यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वन खात्याने तातडीने कारवाई करून संबंधित बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पहा व्हिडिओ : कळंबा कारागृहात बंदीजनांनी भरवला दिवाळी मेळा

हे वाचलंत का?

Back to top button