रेल्वेच्या अधिकार्‍यांवर कारवाई होणार का? कुरकुंभ मोरीच्या कामात हलगर्जीपणा | पुढारी

रेल्वेच्या अधिकार्‍यांवर कारवाई होणार का? कुरकुंभ मोरीच्या कामात हलगर्जीपणा

दौंड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तिसर्‍या कुरकुंभ मोरीचे काम करूनही गटारीच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे दौंडकर नागरिकांना पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ याप्रमाणे नवीन मोरीतूनदेखील गटारीच्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाने त्यांचे अपयश झाकण्याकरिता नवीन बांधलेल्या मोरीला दोन बाजूंना भगदाडे पाडून तुंबणारे पाणी वाहून जाण्यासाठी काम सुरू केले आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी या मोरीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यानेच ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

17 कोटी रुपये पाण्यात घालणार्‍या मुजोर रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांवर कारवाई होणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
सर्व पक्षीय आंदोलने, मोर्चे, रेल रोको अशा संघर्षानंतर या मोरीचे काम सुरू झाले. तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी भूमिपूजन केले. तेव्हापासूनच ही मोरी राजकीय श्रेयवादाच्या भोवर्‍यात अडकली. निधीवरून राज्य व केंद्र सरकार, आमदार, खासदारांनी मोठा खटाटोप केला. पैसे मिळवून दिले, परंतु रेल्वेच्या मुजोर अधिकार्‍यांनी या कामाकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही.

अनेक वेळा खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल यांनी कामाची पाहणी करून त्यातील त्रुटी भरून काढण्यास सांगितले. परंतु, रेल्वे अधिकारी यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे दौंडकरांना मोठ्या संघर्षानंतरदेखील गळकी कुरकुंभ मोरी मिळाली. कुरकुंभ मोरीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शहरातील नागरीहित संरक्षण मंडळ यांनी श्रेय आपणास मिळावे म्हणून मोठा खटाटोप केला. परंतु, या मोरीची स्थिती पाहता सर्वांनीच गप्प बसण्याची भूमिका घेतली आहे.
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणार्‍या रेल्वे प्रशासनाला कोण जाब विचारणार, हा मात्र प्रश्न अनुत्तरीत आहे.

हेही वाचा

रशियाच्या गोळीबारात नवजात बालकासह ७ लोक ठार; युक्रेनचा दावा

सलग सुट्यांमुळे सिंहगड, राजगडावर पर्यटकांची धाव

नगर : शिराळवर आता 14 सीसीटीव्हीचा वॉच

Back to top button