बारामतीच्या शेतकरी दाम्पत्याचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव; स्वातंत्र्यदिनी आयोजन

बारामतीच्या शेतकरी दाम्पत्याचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव; स्वातंत्र्यदिनी आयोजन

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक सुदाम घुले यांचा स्वातंत्र्यदिनी दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. पंतप्रधान कृषी सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकर्‍यांचा सन्मान होणार असून, त्यात घुले यांचा समावेश आहे. 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या राष्ट्रीय दिनाचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्ली येथे सन्मान करण्यात येतो. यंदाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने घुले व त्यांच्या पत्नी मंगल यांचा सन्मान होणार आहे.

केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना सुरू आहे. त्यातील काही प्रातिनिधिक लाभार्थ्यांचा दिल्लीत सन्मान होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावाशेजारील ढेकळवाडीच्या घुले दाम्पत्याचा त्यात समावेश आहे. केंद्राच्या या योजनेत पात्र शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. त्याचा फायदा अल्प व अत्यल्प भूधारकांना होतो. बारामती तालुक्यात 52 हजार 800 लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत 14 हप्त्यापोटी साधारण 145 कोटी रक्कमेचा लाभ बारामती तालुक्यात देण्यात आला आहे. वर्षभरात साधारण 3 टप्प्यांत ही रक्कम शेतकर्‍यांना देण्यात येते.

घुले यांची 60 गुंठे शेती आहे. त्यात ते बाजरी, मका, सोयाबीन, ऊस अशी पिके घेतात. शेतीपूरक उद्योग म्हणून त्यांनी शेळी व पशुपालन सुरू केले आहे. त्यांना चांगले उत्पन्नही मिळत आहे. या योजनेतून आजवर त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे चौदा हप्ते मिळाले आहेत. रक्कम जरी छोटी असली, तरी या रकमेचा फायदा त्यांना खते आणि शेतीला लागणार्‍या इतर गोष्टींसाठी झाला असून, त्यांनी या योजनेबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. येत्या 15 ऑगस्टला दिल्लीतील लाल किल्ला येथील कार्यक्रमात अशोक घुले आणि त्याच्या पत्नी यांना पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले असून, त्याचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.

शब्दाला यश आले आहे

घुले यांनी घरामध्ये गमतीने पत्नीला तुला कुठे फिरायला जायचं आहे, अशी विचारणा केली. त्यावर पत्नीने उपरोधाने मला दिल्लीला नेता का, असे उत्तर दिले. त्यानंतर घुले यांनी पत्नीला दिल्लीतील कार्यक्रमासाठी निमंत्रण आल्याचे सांगितले. सहजपणे पत्नीने व्यक्त केलेली इच्छा यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले. तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी निवड झाल्याची माहिती घुले यांना दिली.

केंद्राची योजना फायद्याची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना अत्यल्प व अल्प भूधारक शेतकर्‍यांसाठी महत्त्वाची आहे. परंतु खते-बियाण्यांचे दर वाढत चालले आहेत. मोदी सरकारने किमान एक हजार रुपयांची वाढ केली पाहिजे, अशी अपेक्षा अशोक घुले यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news