पुढारी वृत्तसेवा : तारा सिंगच्या खास भूमिकेत पुन्हा एकदा परतत असलेल्या सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 40.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अनिल शर्मा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
यापूर्वी 2001 मध्येदेखील त्यांनीच 'गदर : एक प्रेम कथा' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर याचा सिक्वेल शुक्रवारी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 40 कोटी रुपयांचे कलेक्शन झाल्याने आम्ही उत्साहित आहोत, असे या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नमूद केले. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओजने केली असून यात अमिषा पटेलने सकिनाची साकारलेली भूमिकादेखील प्रेक्षकांच्या बर्याच पसंतीस उतरली आहे.
याशिवाय उकर्ष शर्माने चरणजितची भूमिका साकारली आहे. 'गदर 2' ही 1971 मधील कथेवर आधारित आहे. पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेल्या आपल्या मुलाला-चरणजितला आणण्यासाठी महत्त्वाकांक्षी तारा सिंग कसा संघर्ष करतो, यावर यात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
'गदर-2' चित्रपटाला या वर्षातील दुसरे सर्वोत्तम ओपनिंग मिळाले असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. यापूर्वी शाहरूख खानच्या अॅक्शनपट 'पठाण'ने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.