पुण्यातील पानशेत धरण अखेर 100 टक्के भरले | पुढारी

पुण्यातील पानशेत धरण अखेर 100 टक्के भरले

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांपासून पानशेत-वरसगाव खोर्‍यातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणसाखळीत पाणीसाठ्याची वाढ मंदावली आहे. शनिवारी सायंकाळी पाचपर्यंत खडकवासला प्रकल्पात एकूण 26.37 टीएमसी (90.47 टक्के) इतका पाणीसाठा झाला होता. पानशेत धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणसाखळीत दीड टीएमसी पाणी कमी आहे. गेल्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी धरणसाखळीत 27.77 टीएमसी (96.03 टक्के) इतका पाणीसाठा होता.

तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला होता. जोरदार पाऊस पडणार्‍या रायगड जिल्ह्यालगतच्या दापसरे, तव दासवे, शिरकोली भागांतही पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्याची वाढ मंदावली आहे. शनिवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाचपर्यंत टेमघर येथे 10 मिलीमीटर, वरसगाव व पानशेत येथे प्रत्येकी 3 मिलीमीटर पाऊस पडला. तर खडकवासला धरण परिसरात पावसाची नोंद झाली नाही. खडकवासला, सिंहगड भागातही पावसाने उघडीप दिली आहे.

पानशेतकरांकडून इतिहासाला उजाळा देत जलपूजन

पानशेत (तानाजी सागर) धरण जवळपास शंभर टक्के भरले आहे. यानिमित्त पानशेतकरांनी धरणाचे जलपूजन केले. या वेळी ज्येष्ठ धरणग्रस्तांंसह प्रमुख कार्यकर्त्यांनी इतिहासाला उजाळा दिला. पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर व स्थानिक शाखा अभियंता प्रतिक्षा मारके यांच्या हस्ते पारंपारिक जलपूजन करण्यात आले. पासलकर म्हणाले, ‘पानशेत धरण खोर्‍याला त्याग व शौर्याचा इतिहास आहे. पुण्याच्या पाण्यासाठी पानशेत धरणासाठी घरे, जमीन देऊन शेतकर्‍यांनी राष्ट्रीय कर्तृत्व बजावले. त्यांच्या त्यागामुळे पुण्यासह परिसराच्या विकासाला चालना मिळाली.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण राऊत, पानशेत विभाग अध्यक्ष अंकुश पासलकर, शाखा अभियंता अनुराग मारके, विकास प्रतिष्ठानचे लालासाहेब पासलकर, शांताराम ठाकर, बाळासाहेब कोंडेकर आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा

कोथरूड : वर्तुळाकार वाहतुकीचा खेळखंडोबा

अनन्याच्या ‘ड्रीम गर्ल 2’चे प्रमोशन

निपाणी : चारचाकीच्या धडकेत बोळावीचा वनकर्मचारी ठार; सहकारी गंभीर

Back to top button