कोथरूड : वर्तुळाकार वाहतुकीचा खेळखंडोबा

कोथरूड : वर्तुळाकार वाहतुकीचा खेळखंडोबा

कोथरूड; पुढारी वृत्तसेवा : कर्वेनगर राजाराम पूल परिसरातील डी. पी. रस्त्यावर अर्धवट अवस्थेत असलेले दुभाजकाचे तुकडे ठेवण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालक वाटेल तेथून वाहने वळवत असल्याने अपघात होत आहेत. या ठिकाणी वर्तुळाकार वाहतूक होणे अपेक्षित आहे. मात्र, अधर्वट अवस्थेतील दुभाजक वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.

कर्वेनगर, वारजे-माळवाडी भागाकडून स्वारगेट, म्हात्रे पुलाकडे जाण्यासाठी राजाराम पूल मार्गावर नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. सिंहगड रोडकडून कर्वेनगर, कोथरूड भागाकडे जाण्यासाठीदेखील हा मार्ग सोयीचा आहे. या ठिकाणी असलेल्या डी. पी. रस्त्यावरील वाहतूक वर्तुळाकार होण्यासाठी प्रशासनाकडून अर्धवट अवस्थेत असलेले दुभाजकाचे तुकडे ठेवण्यात आले आहेत.

हे तुकडे काही अंतरावर ठेवण्यात आल्याने वाहनचालक वाटेल तेथून वाहने चालवत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पर्यायाने या ठिकाणी वाहतूक कोंडीही होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर प्रकाश कमी असल्याने या दुभाजकांना वाहने घासत आहेत. तसेच या ठिकाणी अपेक्षित असलेल्या वर्तुळाकार वाहतुकीचा खेळखंडोबा होत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले.

मनसेचे शाखाध्यक्ष किरण जोशी म्हणाले, की डी. पी. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सध्या रस्त्यावर असलेले अर्धवट अवस्थेतील दुभाजकांचे तुकडे वाहतुकीला अडथळा ठरत आहे असून, यामुळे अपघातही होत आहे.

राजाराम पूल परिसरातील डी. पी. रस्त्यावरील अर्धवट अवस्थेत असलेल्या दुभाजकांची लवकरच पाहणी केली जाईल. त्यानंतर या ठिकाणी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.

-अभिजित डोंबे, अधिकारी, पथ विभाग, महापालिका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news