‘व्हीएसआय’चा राजीनामा देण्यापासून मला पवारांनी रोखले; वळसे-पाटलांचा गौप्यस्फोट | पुढारी

‘व्हीएसआय’चा राजीनामा देण्यापासून मला पवारांनी रोखले; वळसे-पाटलांचा गौप्यस्फोट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीनंतर अजित पवार गटात सामील झालेले राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार होते. मात्र व्हीएसआय आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच मला राजीनामा देण्यापासून रोखून मला काम करायला सांगितले आहे, ही गोष्ट खरी असल्याचा गौप्यस्फोट वळसे-पाटील यांनी येथे केला. आम्ही शरद पवार यांना सोडले असले तरी ते आमचे नेते असून उद्याही राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर शरद पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले वळसे-पाटील हे मांजरी येथील व्हीएसआयच्या मुख्यालयात शनिवारी (दि. 12) झालेल्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे आयोजित तांत्रिक चर्चासत्राच्या निमित्ताने प्रथमच एकत्र आले. तत्पूर्वी एका प्रश्नाच्या उत्तरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले, आज व्हीएसआयमध्ये कुठलीही राजकीय बैठक नव्हती. पवारांसोबतच्या कार्यक्रमात मला कोणताही अवघडलेपणा नव्हता. विरोधी पक्षनेते असताना अजित पवार हे अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करीत असत. ते आता स्तुती करीत असल्याबद्दल छेडले असता, वळसे-पाटील म्हणाले, त्यांचे प्रश्न त्यांनाच विचारा. केंद्र सरकारकडून सहकार कायद्यात बदल करण्यासाठीचा एक मसुदा तयार केला जात असून महाराष्ट्रासाठी कोणत्या नव्या गोष्टी आणता येतात यावर विचार करीत आहोत. यासंदर्भात मी शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले.

उसाच्या तांत्रिक चर्चासत्रास शेजारी शेजारी बसून पवार व पाटील यांनी चर्चाही केली. व्यासपीठावर येतानाही दोघे बरोबर आले. मात्र चर्चासत्र संपण्यापूर्वी काही कामानिमित्त शरद पवार आणि जयंत पाटील हे मध्येच निघून गेले. जाताना व्यासपीठावर बसलेले राजेश टोपे यांना बोलावून त्यांनी सभागृहाबाहेर थोडी चर्चा केली आणि टोपे पुन्हा स्थानापन्न झाले. चर्चासत्राच्या प्रश्नोत्तरात पवार यांनी भाग घेतला. मात्र, भाषण न करताच ते सभागृहाबाहेर गेल्यामुळे राजकीय जुगलबंदी झालीच नाही.

म्हणून अजित पवार गैरहजर

साखर महासंघाच्या चर्चासत्रात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. व्हीएसआयऐवजी महासंघाचा कार्यक्रम असल्याने कदाचित अजित पवार अनुपस्थित राहिले, असे राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले; तर चर्चासत्रांनतर वळसे-पाटील म्हणाले, पवार आणि मी कार्यक्रम ठरवून घेतले होते. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा शासकीय कार्यक्रम असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे उपस्थित राहिले, तर मी या चर्चासत्राला हजर राहिलो.

हेही वाचा

एकेकाळी मंगळावर होते पृथ्वीसारखे ऋतुचक्र

रहस्‍यरंजन : पद्मनाभ स्वामी मंदिराचे गूढ

नगर : छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकासाठी भरीव निधी देणार : आ.राम शिंदे

Back to top button