रहस्‍यरंजन : पद्मनाभ स्वामी मंदिराचे गूढ | पुढारी

रहस्‍यरंजन : पद्मनाभ स्वामी मंदिराचे गूढ

ऋतुपर्ण

भगवान विष्णूच्या 108 प्रमुख मंदिरांपैकी पद्मनाभ स्वामी मंदिर आहे. त्याच्या स्थापत्यशैली आणि वास्तुकलेवर विशेष लक्ष दिले गेल्याचे लक्षात येते. यामुळेच दक्षिण भारतातील उत्कृष्ट वास्तुकलेच्या उदाहरणांमध्ये या मंदिराचा समावेश होतो. या मंदिराची स्थापत्यशैली गोपूरम द्रविड आहे. पद्मनाभ स्वामी मंदिर हे दक्षिण भारतीय स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिराचा परिसर खूप मोठा असून, सात मजली उंच आहे. गोपूरम कलाकृतींनी सजवलेले आहे. मंदिराचे 30 मीटर उंच आणि सात मजली गोपूरम द्राविडीयन शैलीत बांधले गेले आहे, तर उर्वरित वैशिष्ट्ये केरळ शैलीतील असल्याचे दिसते. मंदिराजवळ एक तलावदेखील आहे जो ‘पद्मतीर्थ कुलम’ म्हणून ओळखला जातो. मंदिराचे बांधकाम द्रविड आणि केरळ शैलीतही दिसून येते. हे मंदिर केरळमधील प्रसिद्ध धार्मिकस्थळांपैकी एक आहे. केरळच्या संस्कृती आणि साहित्याचा अनोखा संगम मंदिराच्या रचनेत आहे. एका बाजूला खळखळणारा अथांग समुद्र आणि दुसर्‍या बाजूला पश्चिम घाटातील पर्वतांचे अद्भुत नैसर्गिक सौंदर्य या सर्वच गोष्टी कमालीच्या आहेत. मंदिरावर असलेली बांधकामातील कारागिरी कुणालाही मोहात पाडणारी आहे.

मंदिराच्या गर्भगृहात भगवान विष्णूची भव्य मूर्ती विराजमान आहे. ती शयनमुद्रावस्थेत आहे. म्हणूनच या मंदिरास अनंतशयनम आणि अनंत पद्मनाभ मंदिर असेही म्हटले जाते. हे मंदिर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. या मूर्तीमध्ये भगवान विष्णू शेषनागावर निद्रावस्थेत विराजमान आहेत. भगवान विष्णूंच्या विश्रांतीच्या अवस्थेला ‘पद्मनाभ’ म्हणतात आणि या रूपात विराजमान झालेले भगवान पद्मनाभ स्वामी म्हणून ओळखले जातात. केरळची राजधानी तिरुअनंतपूरमचे नाव अनंत नावाच्या परमेश्वराच्या नागाच्या नावावरून पडले आहे, असे मानले जाते.

त्रावणकोरचे महाराजा अनिझम थिरुनल मार्तंड वर्मा यांनी हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित केलं होतं. सोबत संपूर्ण राज्य भगवान विष्णूच्या चरणात समर्पित केलं होतं. भगवानालाच राजा घोषित केलं होतं. भगवान विष्णूच्या मूर्तीसमोर राजाने ही शपथ घेतली होती की, आपण आणि आपल्या भावी पिढ्या इथल्या भगवंताच्या सेवेत समर्पित राहतील, असा उल्लेख इतिहासात आहे. शतकानुशतकांपासून आजतागायत या मंदिरात भगवान विष्णूची पूजा, सेवा कायम आहे.

मंदिराचा भव्य इतिहास, स्थापत्य सौंदर्य, सुवर्ण स्तंभ आणि खजिन्याच्या तिजोरीचे रहस्य यासाठी प्रसिद्ध पद्मनाभ मंदिर आहे. वैष्णव पंथासाठी या स्थानाला खूप महत्त्व आहे. या मंदिराचा सातवा दरवाजा सापांनी सुरक्षित ठेवला आहे, त्यामुळे आजपर्यंत कोणीही ते उघडू शकले नाही, असे मानले जाते. पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा ‘व्हॉल्ट बी’ नावानेही ओळखला जातो. ‘व्हॉल्ट बी’ दरवाजावर सापांचे कोरीव शिल्प आहे. असे म्हटले जाते की, येथे लपलेल्या खजिन्याचे हे साप रक्षण करतात आणि अनेकांनी तो उघडण्याचा प्रयत्न केला; पण त्यांचा विषारी सापाच्या दंशाने मृत्यू झाला.

प्रचंड संपत्तीमुळे मंदिर नेहमी चर्चेत राहते आणि यासोबतच या मंदिराशीही एक गोष्ट जोडली गेली आहे, जी आजपर्यंत एक रहस्यमयच राहिलेली आहे. या जगप्रसिद्ध मंदिरात अनेक गुप्त तळघरे आहेत, त्यापैकी काही तळघरे खूप आधी उघडली गेली आहेत. परंतु, एक दरवाजा आहे, जो उघडणे अशक्य आहे. तो उघडणे कुणालाही शक्य नाही, यामागे कोणते खोल रहस्य दडले आहे हेही कुणी सांगू शकत नाही. भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या मंदिरात देवाची एवढी मोठी मूर्ती आहे की, ती मंदिरात बांधलेल्या तीन दरवाजांतून दिसते. पहिल्या दरवाजातून मूर्तीचे मस्तक दिसते, मध्यभागी असलेल्या दरवाजातून भक्ताला भगवंताच्या नाभीतून उमललेले कमळ आणि शेवटच्या दरवाजातून पाय दिसतात.

या मंदिरात अशा तिजोर्‍या आहेत, ज्यांना ए, बी, सी, डी, ई आणि एफ अशी नावे आहेत. 2014 च्या अहवालात असे सांगण्यात आले होते की, येथे आणखी दोन तळघरे आहेत, ज्यांची नावे ‘व्हॉल्ट जी’ आणि ‘व्हॉल्ट एच’ होती. या तळघरांमध्ये लाखो सुवर्णमुद्रा, सोने-चांदी आणि हिरे-रत्ने सापडली आहेत. त्याची किंमत अब्जावधीमध्ये आहे. ‘व्हॉल्ट बी’ यास निलावार किंवा कल्लारा असेही म्हटले जाते. असे म्हटले जाते की, हा दरवाजा शापित आहे आणि तो उघडला गेला तर काही तरी अशुभ घडेल. या मंदिरात भृगू मुनी आणि मार्कण्डेय मुनी, गरुड, नारद, तुंबरू (एक खगोलीय संगीतकार), सूर्य, चंद्र, सप्तर्षी, मधू आणि कैटभ (दोन राक्षस) यांच्या मूर्ती आहेत.

मंदिरात 776 किलो वजनाच्या सोन्याच्या वस्तू चोरी झाल्याची माहिती समोर आली होती. या वस्तूंची किंमत 186 कोटी रुपये आहे. 1988 मध्ये सोन्याच्या वस्तूंपैकी 397 वस्तू राहिल्या आहेत. असे म्हटले जाते. मार्तंड वर्मा राजाने पोर्तुगाली समुद्री बेडे आणि त्याच्या खजान्यावरही कब्जा केला होता. युरोपीय लोक मसाले, खासकरून काळी मिरीसाठी भारतात येत होते. त्रावणकोरने या व्यवसायावर संपूर्णपणे कब्जा केला होता. मसाल्यांच्या व्यापारातून राज्याला खूप फायदा झाला आणि ही संपत्ती या मंदिरात ठेवली गेली. रहस्यमयी दरवाजा लाकूड आणि साखळ्या किंवा लोखंडी बोल्ट वगैरे वस्तूंनी बंद केलेला नाही, तर काही खास मंत्रांच्या उच्चारणाने बंद करण्यात आल्याचे म्हटले जाते. काही ऋषींनी नागपाशमसारख्या शक्तिशाली मंत्राने दरवाजा बंद केला आहे. आता गरुड मंत्राचे योग्य उच्चारण करणारा ज्ञानीच हा दरवाजा उघडू शकतो, असे म्हटले जाते.

Back to top button