परदेशी विद्यार्थ्यांना पिंपरीची भुरळ ; शिक्षणासाठीच्या व्हिसाचे प्रमाण अधिक | पुढारी

परदेशी विद्यार्थ्यांना पिंपरीची भुरळ ; शिक्षणासाठीच्या व्हिसाचे प्रमाण अधिक

वर्षा कांबळे

पिंपरी : पुण्यातील काही नामांकित संस्थांनी आपल्या शाखांचा विस्तार पिंपरी-चिंचवड शहरात केल्यामुळे हे शहर आता एज्युकेशन हब बनत आहे. अशाप्रकारे एज्युकेशन हब बनलेल्या शहरात परदेशी विद्यार्थीही शिक्षणासाठी पसंती देत आहेत. त्यामुळे परदेशातून आलेल्यांपैकी सर्वांत जास्त व्हिसा हा शिक्षणासाठी असल्याचे पोलिसांच्या नोंदणीवरून दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे मोठमोठ्या उद्योगांमुळे उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. मोठमोठ्या कंपन्या जशा शहरात आल्या तसा शहराचा औद्योगिक विकास झाला. मात्र, त्यामानाने शिक्षणाच्या सोयीसुविधा फारच कमी होत्या. उच्च शिक्षणासाठी शहरातील विद्यार्थ्यांना पुण्यात जावे लागत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आता हे शहर एज्युकेशन हब म्हणून समोर येत आहे. परिणामी, देशातीलच नव्हे, तर परदेशातील विद्यार्थीही या शहराला शिक्षणासाठी प्राधान्य देत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून येते.
परदेशी विद्यार्थ्यांची नोंदणी पोलिसांकडे होत असते.

पोलिसांकडे नोंद असलेल्या 1200 परदेशी नागरिकांपैकी 445 परदेशी विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी आलेले आहेत; तर इतर नोकरी, व्यवसाय या कारणांसाठी आलेले आहेत, अशी पोलिस आयुक्तालयात नोंद आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातील विद्यार्थ्यांनाही नेहमीच खुणावत आले आहे. देशांतील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येतात. या विद्यार्थ्यांची पहिली पसंती पुण्याला असते. पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते.

सध्या शहराची लोकसंख्या जवळपास 27 लाख आहे. यामध्ये विद्यार्थिसंख्या 7 ते 8 लाखांच्या आसपास आहे. त्यामुळे शहरातील काही स्थानिक लोकांनी शहराची शैक्षणिक गरज ओळखून विविध शैक्षणिक संस्था उभारल्या. त्या वेळी प्रवासाच्या पुरेशा सोयीदेखील नव्हत्या, तसेच मुलींना पुण्यात शिकायला पाठवयाला पालक तयार होत नसत. पण, आता सर्व बदलत चालले आहे.

शहरात सध्या इंजिनिअरिंग, मेडिकल, विधी, आर्किटेक्चर कॉलेज यांसारख्या शैक्षणिक सुविधा वेगाने वाढत आहेत. हॉर्टिकल्चर व शास्त्र, एनडीए अशा बाबी सोडल्या तर सर्व गोष्टींचा अंतर्भूत आहे. शैक्षणिकबाबत पुणे जसे शिक्षणाचे माहेरघर आहे, तोच पिंपरी-चिंचवड हादेखील पुण्याचाच एक भाग असून, एज्युकेशन हबकडे वाटचाल करीत आहे.

बहुतांश विद्यार्थी आता पिंपरी-चिंचवड शहरात शिकून उच्च पदावर काम करताना दिसतात. आता शहरात शिकण्यासाठी परदेशी विद्यार्थीदेखील आहेत. पूर्वी शहरातील विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागत होते. आता बाहेरगावचे विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी व वास्तव्यास येत आहेत.  शिक्षणाबाबत शहर आता समृद्ध होत आहे. पुण्याइतक्याच तोडीच्या शिक्षण संस्था शहरात आहेत. मात्र, तितकासा दर्जा व लौकिक शहरास मिळालेला नाही, इतकाच काय तो फरक आहे.

हेही वाचा :

डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शनसह ४ विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोने केला प्रवास, प्रवाशांशी साधला संवाद

 

 

Back to top button