जागतिक हत्ती दिन : देशातील 27 हजार हत्तींचे डीएनए जतन करणार

जागतिक हत्ती दिन : देशातील 27 हजार हत्तींचे डीएनए जतन करणार

पुणे : हत्तींच्या संवर्धनासाठी आता त्यांच्या डीएनए जतनाचे काम भारत सरकारच्या 'हत्ती प्रकल्प'ने (प्रोजेक्ट एलिफंट) नुकतेच सुरू केले असून, सध्या देशभरात बंदिस्त वातावरणात राहणार्‍या सुमारे 2 हजारांपैकी 270 हत्तींच्या डीएनएचे जतन झाले आहे. देशात सद्य:स्थितीत फक्त 27 हजार हत्ती शिल्लक आहेत. त्यामुळे जंगलातील हत्तींच्या कानावर मायक्रोचिप बसवून त्यांच्या डीएनएचे जतन केले जाणार आहे. देशात संघटितपणे होणार्‍या हत्तींच्या शिकारीचे प्रमाण पाचपटीने वाढले आहे.

दहा वर्षांपूर्वी देशात हत्तींची संख्या एक लाख होती, ती आता केवळ 27 हजार 500 इतकी आहे. आशियाई हत्तींची संख्या जगात भारतात सर्वाधिक असून, नर हत्तींच्या शिकारीचे प्रमाण मादी हत्तींच्या तुलनेत 70 टक्क्यांनी जास्त आहे. कारण, आशियाई नर हत्तींना मोठे सुळे येतात. त्यामुळे त्यांची शिकार वेगाने होत आहे. आगामी दहा वर्षांत हत्तींच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

हस्तिदंताची जगभरात मोठी मागणी आहे. त्यापासून विविध शोभेच्या वस्तू अन् दागिनेही तयार केले जातात. त्यामुळे हत्तींच्या शिकारीचे प्रमाण जगभरासह भारतातही वाढले आहे. प्रामुख्याने आशियाई व आफ्रिकन हत्तींची संख्या जगात जास्त होती. ती आता खूप कमी होत आहे. त्यावर काम करण्याच्या हेतूने 12 ऑगस्ट 2012 पासून जागतिक हत्ती दिन जगभर पाळला जाऊ लागला. यंदा हत्ती दिनाचे 11वे वर्ष आहे. हत्तींच्या शिकारीविरोधात भारतात अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत.

  • सध्या बंदिस्त हत्तीच्या डीएनएवर काम सुरू
  • 'प्रोजेक्ट एलिफंट'ने केले 30 वर्षे संशोधन
  • एप्रिलमध्ये काझिरंगा अभयारण्यात होणार 'गज उत्सव'
  • हत्तीच्या संघटित शिकारीचे प्रमाण पाचपटीने वाढले
  • आता उरले फक्त 27 हजार 875 हत्ती
  • दहा वर्षांपूर्वी होते 1 लाख
  • जगातील 50 टक्के आशियाई हत्ती भारतात
  • नर हत्तींची संख्या चिंताजनक
  • अवघ्या दहा वर्षांत हत्तींच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका

आसाममध्ये यंदा होणार 'गज उत्सव'

देशातील हत्तींच्या संवर्धनासाठी भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने 1992 मध्ये हत्ती प्रकल्प (प्रोजेक्ट एलिफंट) सुरू केला. देशात आता फक्त 27 हजार 500 हत्ती शिल्लक आहेत. यापैकी 2 हजार 675 बंदिस्त ठिकाणी राहतात. त्यातील 270 हत्तींच्या डीएनए प्रोफायलिंगचे काम पूर्ण झाले आहे. 'प्रोजेक्ट एलिफंट'ला 30 व वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यंदा 7 व 8 एप्रिल रोजी आसाममधील काझिरंगा अभयारण्यात 'गज उत्सव' साजरा केला जाणार आहे. त्याचे उद्घाटन राष्ट्रपती दौपदी मुर्मू करणार आहेत. उद्घाटन तसेच वन अधिकार्‍यांसाठी 'गज सूचना' मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.

राज्यवार हत्तींची संख्या (2022 च्या गणनेनुसार)

– केरळ 3054, तामिळनाडू 2791,ओडिशा 1966, मेघालय 1754, आसाम 5719, कर्नाटक 6049, अरुणाचल 1614, झारखंड 679, नागालँड 432, छत्तीसगड 0247, त्रिपुरा 203, उत्तर प्रदेश 232, पश्चिम बंगाल 700, तेलंगण 57, राजस्थान 84, मध्य प्रदेश 07, महाराष्ट्र 06, मिझोराम 07.

  • 12 ऑगस्ट 2012 रोजी आशियाई आणि आफ्रिकन हत्तींच्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक हत्ती दिनाची सुरुवात.
  • भारतात संघटित वन्यजीव शिकारीचे प्रमाण पाचपटीने वाढले
  • 1990 ते 1996 या काळात सर्वाधिक हत्तींची शिकार
  • हत्तीच्या शवांच्या नोंदणी सदोष असल्यामुळे आकडेवारीत मोठी तफावत
  • पंजाब, हरियाणा, मणिपूर, हिमाचल प्रदेश, सिक्कीम भागातील आकडेवारी उपलब्ध नाही.
  • हत्तींच्या शिकारीचा अभ्यास करणारे विवेक मेनन यांच्या मते हत्तीच्या मारण्याच्या नवीन पध्दती शिकार्‍यांनी शोधल्या.
    भारतातून होते हस्तिदंताची मोठी तस्करी
  • मथुरा येथे 2018 मध्ये भारतातील पहिले एलिफंट हॉस्पिटल
  • प्रोजेक्ट एलिफंटने 2018 मध्ये केलेल्या गणनेनुसार भारतात 2 हजार 454 बंदिस्त हत्ती
  • प्रोजेक्ट एलिफंटने सुरू केला हत्तीचा कॉरिडॉर व अभ्यास
  • 30 वर्षांत 1 हजार हत्तींच्या कानावर मायक्रोचिप बसविल्या

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news