पंतप्रधानांनी मनात आणले तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल : राहुल गांधी

पंतप्रधानांनी मनात आणले तर दोन दिवसांत मणिपूर शांत होईल : राहुल गांधी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनात आणले तर ते दोन दिवसांत मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतात. तेवढे पर्याय त्यांच्याकडे आहेत. पण त्यांना मणिपूर जळू द्यायचे आहे. मणिपूरवर चर्चा होत असताना पंतप्रधान लोकसभेत हसत होते, टिंगल करत होते. हे पंतप्रधानपदाला शोभणारे नाही, अशी जळजळीत टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली.

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेची हत्या करण्याचा मानस ठेवणार्‍या विरोधकांना निशाण्यावर घेतले होते. राहुल गांधी यांनी त्याला प्रत्युत्तर शुक्रवारच्या पत्रपरिषदेत दिले. राहुल गांधी म्हणाले की, आपल्या 19 वर्षांच्या राजकारणाच्या अनुभवात मणिपूरमध्ये जे बघितले ते कुठेही बघायला मिळाले नाही. मणिपूर दौर्‍यात मैतेयींनी आमच्या ताफ्यातील कुकींना विरोध केला, तर कुकींनी मैतेयींना विरोध केला. इतकी दरी निर्माण झाली आहे. राज्य दोन तुकड्यांत विभागले गेले आहे. आम्ही जेव्हा या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करत होतो तेव्हा पंतप्रधान हसून, विनोद करून बोलत होते. विषय फक्त काँग्रेसचा नाही तर मणिपूर जळत आहे हा आहे, असेही ते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी मणिपूरला जायला हवे होेते. भारताचे सैन्य दोन दिवसांत राज्य शांत करू शकते. पण पंतप्रधान मणिपूरला जळू देत आहेत. त्यांना राज्य शांत झालेले नको आहे, असा आरोपही गांधी यांनी केला.

पंतप्रधान पदाचा नव्हे प्रश्न मणिपूरचा आहे

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी मणिपूरला एकदा तरी जाऊन यायला हवे होते. तेथील समुदायांशी ते संवाद करू शकत होते. चला, शांततेसाठी चर्चा करू, असे ते आवाहन करू शकले असते. पण त्यांचा इरादा तसा कधीच दिसला नाही. 2024 मध्ये मोदी पंतप्रधान होतील का हा प्रश्न नाही. प्रश्न मणिपूरचा आहे, जिथे मुले, नागरिक मारले जात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news