तळेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व वाहतूक पोलीसांनी बुजवले खड्डे | पुढारी

तळेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते व वाहतूक पोलीसांनी बुजवले खड्डे

जगन्नाथ काळे

तळेगाव दाभाडे (पुणे): तळेगाव दाभाडे परीसरात खड्डयांचे प्रमाणात वरचेवर वाढ होत असुन हे अत्यंत धोकादायक आहे. प्रशासन याबाबत उदासीन असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक पोलीस, रिक्षाचालक यांनी काही खड्डे बुजविले आहेत. घरातून निघालेले वाहन चालक वाहनासहित सुरक्षितपणे घरी परत येतील की नाही हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती तळेगाव दाभाडे शहरात धोकादायक खड्डयांमुळे झालेली आहे. धोकादायक खड्डयामुळे यापुर्वी जिवितहानी झालेली आहे. पाऊस पडण्यापूर्वी उन्हाळ्यात सातत्याने नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार हे वारंवार डांबरीकरण आणि खड्डयांबाबत तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निदर्शनास आणून देत होते. प्रशासनाने याकडे गांभिर्याने पाहीले नाही. अजुनही प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे दिसुन येत आहे.यामुळे लोकप्रतिनिधींनी, रिक्षाचालकांनी आणि वाहतूक पोलीसांनी खड्डे अनेक खड्डे बुजविले आहेत.

तळेगाव स्टेशन चौकात खड्डयांमुळे वाहतूक संथगतीने वाहतूक होत असल्यामुळे वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांच्या सुचनेवरुन एमआरसी मटेरियल द्वारे खड्डे बुजविले. रिक्षा चालक दिलीप डोळस यांच्या पुढाकाराने तळेगाव-चाकण महामार्गावर खड्डे बुजविण्यात आले. नितीन पोटे याच्या पुढाकाराने डीपीरोडवरील खड्डे बुजविण्यात आले. गंगा रेसीडन्सी वडगाव लिंक रोड येथे सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे यांच्या पुढाकाराने जेसीबीच्या सहाय्याने अनेक खड्डे बुजविले. अनेक सामाजिक कार्यकर्ते खड्डे बुजविण्याबाबत श्रमदानाच्या आणि अर्थिक योगदानाच्या तयारीत आहेत. तळेगाव परीसर निसर्गरम्य असुन कुंडमळा, श्री चौराईमाता डोंगर, श्री घोरावाडीश्वर डोंगर, पवनानगर, कार्ला, भांजे लोणावळा, खंडाळा आदी ठिकाणी जाण्यासाठी अनेक पर्यटक तळेगाव येथून प्रवास करतात. त्यांनाही खड्डयांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासन खड्डे बुजविणेबाबत सक्रीय नसल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.

तळेगावात खड्डयांचे साम्राज्य आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. खड्डे पाण्याने भरल्यानंतर अंदाज येत नसल्याने अनेक वाहने खड्डयात जात आहेत. यामुळे मी अनेक धोकादायक खड्डे बुजवून घेतले.
– आशिष खांडगे सामाजिक कार्यकर्ते.

तळेगाव – चाकण महामार्गावर अनेक धोकादायक खड्डयामुळे वाहने संथगतीने चालतात. यामुळे नेहमीच्या वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी.
– दिलीप डोळस उपाध्यक्ष तळेगाव-चाकण महामार्ग कृती समिती

हेही वाचा:

पिंपरी : मोहननगर, चिखलीतील गृहप्रकल्पांच्या कामांना मंजुरी

पिंपरी : स्वातंत्र्य दिनासाठी सजली बाजारपेठ

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी उजाडणार 2025

 

Back to top button