पिंपरी : स्वातंत्र्य दिनासाठी सजली बाजारपेठ | पुढारी

पिंपरी : स्वातंत्र्य दिनासाठी सजली बाजारपेठ

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त पिंपरी बाजारपेठेत तिरंगी झेंडे आणि सजावटीचे सामान मोठ्या प्रमाणात विक्रीस ठेवले आहे. दुकानाच्या बाहेर लावलेले तिरंगी रंगातील झेंडे, झुरमुळ्या, बॅच यामुळे संपूर्ण बाजारपेठ तिरंगी झाली आहे. स्वातंत्र्य दिनासाठी विविध संस्था, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये प्रामुख्याने राष्ट्रध्वजाची खरेदी करत असतात. त्यासाठी बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे. विशेषत: ध्वजखरेदीला पसंती दिली जात आहे. मागणीनुसार विविध आकारांमध्ये हे ध्वज उपलब्ध आहेत. यंदाच्या बाजारपेठेतील प्रमुख आकर्षण म्हणजे पोशाखावर लावले जाणारे छोटे झेंडे. लहान आकारातील कागदी, कापडी व मेटलचे झेंडे उपलब्ध झाले आहेत. त्यालाच ग्राहकांची मोठी पसंती आहे.

विविध आकारातील झेंड्यांना मोठी मागणी आहे, तर दरवर्षी पोशाखावर लावणार्या कापडी व मेटलच्या झेंड्यांना पसंती मिळत आहे. याबरोबरच खादीचे कपडे, टोपी, तिरंग्याची थीम असणारे जॅकेट्स, टी-शर्ट, ओढण्या अशा कपड्याच्या विक्रीमध्येही वाढ झाली आहे. त्यातही कुर्ता, पायजमा किंवा पांढर्‍या कुर्त्याला बाजारपेठेमध्ये सर्वाधिक मागणी आहे.

पथकांची संचलनाची तयारी जोरात

स्वातंत्र्य दिनासाठी शाळेची स्वच्छता, वर्गांची सजावट, विविध साहित्यांची दुरुस्ती, विविध पथकांची संचलनाची तयारी अशा प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये प्रसन्न वातावरण असते. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही तेवढ्याच उत्साहाने या सर्वांमध्ये सामाविष्ट होत असतात. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध शाळांमधून काढल्या जाणार्‍या प्रभात फेरी यांचे सर्वांनाच विशेष आकर्षण असते. पारंपरिक वेशभूषेमध्ये लेझीम, ढोल ताशांसह विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात.

हेही वाचा

म्हसोबाचीवाडी दुर्घटनेतील कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे धनादेश सुपूर्त

पिंपरी : कुरिअरच्या नावाखाली महिलेला 37 लाखांचा गंडा

नाशिक : दुहेरी हत्‍याकांडाने संजिवनगर परिसर हादरला; तीन अल्‍पवयीन ताब्‍यात

Back to top button