पृथ्वी शॉचा डबल धमाका; इंग्लंडमधील स्पर्धेत 153 चेंडूंत 244 धावांची खेळी | पुढारी

पृथ्वी शॉचा डबल धमाका; इंग्लंडमधील स्पर्धेत 153 चेंडूंत 244 धावांची खेळी

लंडन; वृत्तसंस्था :  पृथ्वी शॉने बुधवारी लंडन वन डे कप स्पर्धेत डबल धमाका उडवून दिला. वन डे कप स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात हिट विकेट झालेल्या पृथ्वीने दुसर्‍या सामन्यात मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाजांची विकेट काढली. 11 षटकार आणि 28 चौकारांची आतषबाजी करताना त्याने 153 चेंडूंत 244 धावांची खेळी केली. त्याच्या या द्विशतकाने अनेक विक्रम मोडले तर काही नवीन बनले.

इंग्लंडमध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंत बेन डकेटची नाबाद 220 धावांची खेळी (इंग्लंड लायन्स वि. श्रीलंका ए, 2016) ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी होती; परंतु काल पृथ्वीने 244 धावा करून या स्थानावर जाऊन बसला. एलिस्टर कूकने 2002 मध्ये सरेकडून खेळताना ग्लॅमोर्गनविरुद्ध 268 धावा केल्या होत्या.

पृथ्वी शॉने 244 धावा चोपून लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा चौथा भारतीय ठरला. या विक्रमात नारायण जगदीसन (277 वि. अरुणाचल प्रदेश), रोहित शर्मा (264 वि. श्रीलंका) व शिखर धवन (248 वि. दक्षिण आफ्रिका ए) हे आघाडीवर आहेत आणि भारताबाहेरील लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीत पृथ्वी दुसर्‍या क्रमांकावर आहे. धवनने प्रटोरिया येथे 248 धावा चोपल्या होत्या. इंग्लंडमध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी हा पहिला भारतीय ठरला आहे. सौरव गांगुलीने 1999 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 183 धावा केल्या होत्या. नॉर्थहॅम्प्टनशायर क्लबकडून द्विशतक करणारा पृथ्वी पहिला फलंदाज आहे. वेन लॉर्किन्सने वॉर्विकशायरविरुद्ध 1983 मध्ये नाबाद 172 धावा केल्या होत्या.

दोन देशांत, दोन संघांकडून द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ हा फलंदाज आहे. त्याने मुंबईकडून खेळताना पुद्दुचेरीविरुद्ध नाबाद 227 धावा केल्या होत्या आणि काल नॉर्थहॅम्प्टनशायरकडून द्विशतक झळकावले. 129 चेंडूंत त्याने द्विशतक झळकावले आणि इशान किशन नंतर (126 चेंडू) लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारतीयाने केलेले दुसरे जलद द्विशतक ठरले.

पृथ्वी शॉने त्याच्या 244 धावांच्या खेळीत 28 चौकार व 11 षटकार असे एकूण 39 चेंडू सीमापार पाठवले. 200+ धावा करताना इतके चेंडू सीमापार पाठवणारा तो तिसरा फलंदाज ठरला. रोहितने श्रीलंकेविरुद्ध आणि अली ब्राऊने ग्लॅमोर्गनविरुद्ध 42 चेंडू सीमापार पाठवले होते. तर जगदीसनने 40 चेंडू सीमापार पाठवले.

Back to top button