कोल्हापूर : मुलींना दारू पाजून लैंगिक अत्याचार खटल्यात 2 नराधमांना कारावास | पुढारी

कोल्हापूर : मुलींना दारू पाजून लैंगिक अत्याचार खटल्यात 2 नराधमांना कारावास

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून इस्लामपूर येथील खोलीत कोंडून जबरदस्तीने दारू पाजून दोन दिवस अत्याचार करणार्‍या दोन नराधमांना सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी गुरुवारी दोषी ठरविले. तसेच आरोपींना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी 8 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 2 व 3 नोव्हेंबर 2018 रोजी हा अत्याचाराचा घृणास्पद प्रकार घडला होता.

प्रमोद हणमंत शिंदे (वय 24, रा. पवार मळा, गांधीनगर) व हर्षल आनंदा देसाई (24, इस्लामपूर, जि. सांगली) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी तिन्हीही जिवलग मैत्रिणी असलेल्या अल्पवयीन मुलींना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून भरदिवसा अपहरण करून इस्लामपूर येथे नेले. तेथे त्यांच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस चौकशीत उघड झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. शहरातील विविध महिला संघटनांसह सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी तत्कालीन पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन नराधमांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे खटल्याच्या निकालाकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. सरकारी पक्षामार्फत विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमिता ए. कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, पीडित तिन्हीही मुली व आरोपी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. ओळखीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन साथीदारासह तिघांनी 2 नोव्हेंबर 2018 रोजी मुलींचे भरदिवसा अपहरण केले. तीनही मुलींना इस्लामपूर येथील तिरंगा कॉलनीतील दोन मजली इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील खोलीत ठेवले. याठिकाणी त्यांना जबरदस्तीने दारू पाजण्यात आली. मुली बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार केले. दुसर्‍या दिवशी 3 नोव्हेंबर 2018 रोजी आरोपींनी मुलींच्या अंगावरील सोन्याचे
दागिने हिसकावून घेतले. कोल्हापूर येथील एका सोनाराकडे त्याची विक्री केली. दागिने विक्रीतून आलेल्या रकमेतून दारू, सिगारेट, चिकन, गांजा घेऊन तिघेही पुन्हा खोलीवर गेले. पीडित मुलींना पुन्हा दारू पाजण्याचा प्रयत्न झाला. मात्र उलट्याचा
त्रास होऊ लागल्याने मुलींनी नकार दिला. तरीही आरोपींनी त्यांना जबरदस्तीने दारू पाजली व त्याच्यावर पुन्हा अत्याचार केले.

दोन दिवस पालकांनी मुलींचा शोध घेतला. मात्र छडा न लागल्याने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घटनेची नोंद केली. महिला पोलिस अधिकारी स्मिता पाटील यांनी मोबाईल टॉवर लोकेशनद्वारे मुलींचा ठावठिकाणा लावला. पोलिस पथकाने इस्लामपूर येथे जाऊन संबंधित खोलीवर छापा टाकला. त्याठिकाणी तिन्ही मुलींसह आरोपी आढळून आले. सर्वांना ताब्यात घेण्यात आले. लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

सह जिल्हा व सत्र न्यायाधीश तिडके यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू होती. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमिता कुलकर्णी यांनी 19 साक्षीदार तपासले. फिर्यादींसह पीडित मुली व अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने दोघांना दोषी ठरवून पाच वर्षे कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.

बालहक्क न्यायालयात स्वतंत्र खटला

खटल्यातील तिसरा संशयित अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध बालहक्क न्यायालयात स्वतंत्र खटला सुरू असल्याचेही विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अमिता कुलकर्णी यांनी सांगितले. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव, डॉ. प्रशांत अमृतकर यांनी या खटल्याचा तपास केला होता.

Back to top button