वाडा : भेगा पडलेल्या पदरवाडीची अधिकार्‍यांकडून पाहणी | पुढारी

वाडा : भेगा पडलेल्या पदरवाडीची अधिकार्‍यांकडून पाहणी

वाडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पदरवाडी या गावाच्या पश्चिमेकडील बाजूस असणार्‍या डोंगराला भेगा पडल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने स्थलांतर करण्याची मागणी केली होती. यामुळे अधिकार्‍यांनी या गावाला भेट देऊन पाहणी केली. मंगळवारी (दि. 8) खेडचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्यासह पशुसंवर्धन अधिकारी डॅा. योगेश शेळके, वाडा गावच्या मंडळ अधिकारी शारदा बडे, विस्तार अधिकारी किसन मोरे, ग्रामसेवक रूपेश मोरे, तालुका स्वयंसेवक बचत गटाचे अधिकारी शिवाजी तेलंगे, तलाठी दीपक धायगुडे, सरपंच दत्तात्रय हिले यांसह अन्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष पदरवाडीत जाऊन पाहणी केली व नागरिकांबरोबर चर्चा केली. या वेळी गोविंद डामसे, रामचंद्र हिले, गणेश दिवाळे, सोमा काठे, तुकाराम दिवाळे यांनी समस्या अधिकार्‍यांपुढे मांडल्या.

गटविकास अधिकारी शिंदे म्हणाले, दहा ते बारा दिवसांपूर्वी डोंगराला पडलेल्या भेगा ही वस्तुस्थिती आहे. याबाबत काय करता येईल याचा विचार सुरू आहे. भू-वैज्ञानिकांकडे तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू असून, भू-वैज्ञानिकांना पत्रही दिले आहे. त्यांचे मत जाणून घेऊन काय करता येईल हे पाहिले जाईल. नागरिकांचे स्थलांतर गरजेचे आहे. भीमाशंकर येथे स्थलांतर करण्याची नागरिकांची मागणी असून, त्यानुसार भीमाशंकर येथील खासगी जागा व अभयारण्याच्या जागेबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याबरोबर एकत्र बसून चर्चा करून पुनर्वसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Lok Sabha FM Speech : अर्थमंत्री सीतारामन यांच्या अविश्वास प्रस्तावावरील भाषणा दरम्यान विरोधकांचा सभात्याग

हिंगोली : खरीप हंगामातील पिकांना पावसाची प्रतिक्षा

नगर : सरकारी कर्मचार्‍यांची मोटरसायकल रॅली

Back to top button