पुणे : पोलिस असल्याचे सांगून 53 लाख उकळले | पुढारी

पुणे : पोलिस असल्याचे सांगून 53 लाख उकळले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ड्रग्जचा धाक अन् पोलिस असल्याची बतावणी करून कारवाई करण्याच्या धाकाने सायबर चोरट्यांनी पुण्यातील माय-लेकीला तब्बल 53 लाख 63 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. याप्रकरणी, एका 23 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 5 जुलैनंतर ऑनलाईन माध्यमातून घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी नागरिकांना आर्थिक गंडा घालण्यासाठी नवीन क्लृप्ती शोधून काढली असून, मुंबई अँटी-नार्कोटिक्स ब्युरोमधून पोलिस बोलत असल्याची बतावणी करत तुमच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगितले जाते आहे. पुढे कारवाईचा धाक दाखवून बँक खाते तपासण्याच्या बहाण्याने त्यांच्या खात्यावरील पैसे आपल्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले जात आहेत. शहरात गेल्या काही दिवसापासून अशा घटना वाढीस लागल्या आहेत. नागरिकदेखील कोणत्याही प्रकारची खात्री न करता केवळ भीतीपोटी आपले पैसे त्यांच्या हवाली करत आहेत.

फसवणुकीच्या जाळ्यात

25 वर्षीय तरुणी उच्चशिक्षित असून, शिक्षण घेत आहे. तिच्या मोबाईलवर एका व्यक्तीने फोन करून तो मुंबई अँटी-नार्कोटिक्स ब्युरोमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना विश्वास वाटावा म्हणून आरोपीने स्काईपद्वारे व्हिडीओ कॉल केला. पुढे सायबर चोरट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत, फिर्यादींना त्यांच्या नावे मुंबई ते तैवान पार्सल पाठवले असून, त्यामध्ये अमली पदार्थ (ड्रग्ज) सापडले आहेत. त्यांना कारवाईचा धाक दाखवत तुमचे व तुमच्या आईचे बँक खाते तपासावे लागेल, असे म्हटले.

फिर्यादींनादेखील ते खरे वाटले. भीतीपोटी त्यांनी सायबर चोरटे सांगतील तसे करण्यास सुरुवात केली. तेथेच दोघी नेमक्या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकल्या. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना एक लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यातील सर्व रोकड आपल्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतली. खूप वाट पाहिली तरी आपली रक्कम परत मिळत नाही, हे लक्षात आल्यानंतर फिर्यादींना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी याबाबत सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पार्सलच्या माध्यमातून अमली पदार्थ पाठवल्याचा असा कोणताही कॉल केला जात नाही. हे सायबर चोरट्यांचे कृत्य आहे. नागरिकांना आर्थिक गंडा घालण्यासाठी त्यांनी रचलेला हा सापळा आहे. अशा वेळी न घाबरता नागरिकांनी आपल्या बँक खात्याची कोणतीही गोपनीय माहिती समोरच्या व्यक्तीला देऊ नये. थोडे प्रसंगावधान राखले तर होणारी फसवणूक टाळता येऊ शकते.

– चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

हेही वाचा

येरवडा कारागृहात मोबाईल आढळला

लवंगी मिरची : मिनी बाहुबली!

पुणे : परीक्षांचं वेळापत्रक ठरलं, आता तयारीला लागा!

Back to top button