लवंगी मिरची : मिनी बाहुबली! | पुढारी

लवंगी मिरची : मिनी बाहुबली!

एखादा साधासुधा क्षुद्र माणूस ज्याची कुठलीही शक्ती नाही किंवा जो कोणालाही कुठल्याही प्रकारचा उपद्रव करू शकत नाही अशा व्यक्तीचे वर्णन करताना झुरळाची उपमा दिली जाते; पण ही झुरळे अत्यंत शक्तिशाली असून ध्यानीमनी असलेले किंवा नसणारे चमत्कार करू शकतात, याचा प्रत्यय नुकताच भारतीय रेल्वेला आला. प्रचंड अवजड असे धूड असलेली रेल्वे थांबवणे कुणा मानवी व्यक्तीला किंवा समूहाला शक्य आहे काय? नाही ना? पण, परवा नांदेड येथून मुंबईला जाणारी एक एक्स्प्रेस रेल्वे झुरळांनी रोखून दाखवली. वातानुकूलित एसीच्या डब्यात इतकी झुरळे होती की, प्रवाशांना बसणे अशक्य होऊन गेले. नाईलाजाने त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबवली आणि आधी झुरळांचा बंदोबस्त करा, तरच पुढे जाऊ देऊ अशी धमकी दिली. म्हणजे पाहा, काही मिलिग्राम वजनाचे झुरळसुद्धा अवजड अशी रेल्वे थांबवू शकतात, हे सिद्ध झाले.

झुरळे बहुधा पृथ्वीच्या प्रारंभापासूनच इथे अस्तित्वात असावीत, असे शास्त्रज्ञ सांगतात. कितीही वाईट परिस्थिती आली किंवा त्यांचे निर्मूलन करण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरी झुरळे दशांगुळे पुरून उरतात आणि माणसाला द्यायचा तो त्रास देत असतात. अतिशय स्वच्छता, टापटीप असणार्‍या महिलेच्या घरातही रात्री सर्वजण झोपले की, झुरळांचा मुक्त संचार सुरू होतो. दिवस, दिवस ही कुठे दडून बसतात किंवा द़ृष्टीसही पडत नाहीत, हे एक आश्चर्यच आहे. बरोबर रात्र झाली आणि सगळे सामसूम झाले की, यांच्या कारवाया सुरू होतात. याचा अर्थ झुरळांना दिवस आणि रात्र चांगली समजते, असा काढायला हरकत नाही. बहुतांश गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक रात्र झाली की, सक्रिय होतात, तसेच झुरळांचे आहे. झुरळे ही महिना महिना अन्न- पाण्याशिवाय राहू शकतात. त्यांचा जीवन कालावधी अंदाजे सहा महिन्यांचा असतो. या काळात नर आणि मादी यांनी प्रजोत्पादन करणे, स्वतःचा जीव वाचवणे आणि असंख्य बेबी झुरळांना जन्म देऊन अवतार कार्य संपवणे ही कार्ये ती करत असतात.

सदरील जी रेल्वे झुरळांच्या त्रासामुळे प्रवाशांनी थांबवली त्या रेल्वेने या झुरळांचा बंदोबस्त करण्यासाठी काही प्रयत्न केले नसतील काय? निश्चितच असे प्रयत्न झालेले असतात. अनेकविध प्रकारची औषधे फवारून पण झाली असतील. या औषधांमध्ये काही आयुर्वेदिक औषधे असतात, तर काही विषारी औषधे असतात. औषध कोणतेही फवारले, तरी त्यामुळे काही प्रमाणात झुरळांची संख्या कमी होते; पण त्यातून वाचलेली झुरळे पुन्हा तेवढ्याच ताकदीने प्रजोत्पादन करतात आणि अवघ्या पंधरा दिवसांमध्ये बाहुबली होऊन माणसापुढे उभी राहतात. डास, झुरळे, चिलटे अशा तत्सम क्षुद्र कीटकांनी आणि उंदीर या अत्यंत नटखट प्राण्याने अवघ्या मानवजातीला जेरीला आणून सोडले आहे. एकवेळेस शेजारचे राष्ट्र सीमेवर कुरापत्या करत असेल, तर युद्ध करून त्याचा बंदोबस्त करणे शक्य आहे; पण घराघरांमध्ये छुपे युद्ध खेळणार्‍या झुरळांचा बंदोबस्त करणे अत्यंत अवघड आहे, याचा प्रत्यय मानव जातीला नेहमी येत असतो. त्यामुळे महाकाय, महाअवजड अशा रेल्वेला थांबवण्याचे काम पण काही मिलिग्रॅम वजन असलेली झुरळे करू शकतात, हे पाहून त्यांना वंदन करावे लागेल.

संबंधित बातम्या
  • झटका

Back to top button