मावळ तालुक्यात खरीप पिके जोमात | पुढारी

मावळ तालुक्यात खरीप पिके जोमात

तळेगाव दाभाडे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मावळ तालुक्यातील दमदार आणि पुरेशा पावसाने तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप सोयाबीन, भुईमूग व कडधान्यांची पिके जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोयाबीन, भुईमुगाची पेरणी

मावळ तालुका हा अतिपाऊस असलेला तालुका आहे. पूर्व पट्ट्यात मात्र पावसाचे प्रमाण कमी असते. या ठिकाणी भात पिकाबरोबरच सोयाबीन, भुईमूग, चवळी, मूग, उडीद, वाटाणा, घेवडा, सूर्यफूल आदी कमी पावसावर येणारी खरीप पिके घेतली जातात. या वर्षी पूर्व पट्ट्यात दमदार आणि पुरेसा पाऊस पडलेला असल्याने या भागातील शेतकर्‍यांनी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केलेली आहे.
पूर्व भागातील सांगवडे, दारुंबे, साळुंब्रे, गोडुंबरे, शिरगाव, सोमाटणे, धामणे, परंदवडी, उर्से, शेलारवाडी, कोटेश्वरवाडी, इंदोरी माळवाडी, वराळे, नाणोली, नवलाख उंबरे, सुदवडी, सुदुंबरे या गावांमध्ये खरीप भात पिकाबरोबरच सोयाबीन, भुईमूग, चवळी, मूग, उडीद, वाटाणा या पिकांच्या पेरण्या शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या आहेत. त्यातच सध्या दमदार पाऊस पडल्याने ही सर्व पिके जोमात आलेली आहेत. मावळ तालुक्यात या वर्षी चांगला पाउस झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.मागील दोन-तीन वर्ष चक्री वादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी खरीप पिकांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण

सध्या मान्सूनच्या पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने आणि सूर्यदर्शन होऊ लागल्याने पिकांची वाढही चांगली होत आहे. त्यामुळे शेतकरीबांधव समाधानी आहेत. तसेच, सोयाबीन, भुईमूग, चवळी, मूग, उडीद, वाटाणा, घेवडा, सूर्यफूल आदी खरीप पीक दमदार आले असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा

पवन मावळात दोन हजार हेक्टरवर भात लागवड

ग्रामीण जनतेचा आरोग्य दूत हरपला; डॉ.शशिकांत अहंकारी यांचे निधन

अहमदनगर : मनपासाठी मनुष्यबळाचा मार्ग मोकळा

Back to top button