पाकिस्तानच्या सीमेजवळून जप्त केल्या महागड्या गाड्या | पुढारी

पाकिस्तानच्या सीमेजवळून जप्त केल्या महागड्या गाड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : झुमकार अ‍ॅपद्वारे गाडी बुक केल्यानंतर तिचा अपहार करून बाहेरच्या राज्यात विक्री करणार्‍याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. सुफीयान जे. चौहान (वय19, रा. वडोदरा, गुजरात) असे त्याचे नाव आहे. त्याने पुण्यातून लंपास केलेल्या गाड्या राजस्थानमधील पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या गावात विक्री केल्या होत्या. 60 लाख रुपये किंमतीच्या तीन गाड्या पोलिसांनी जप्त केल्या असून, त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

चंदननगर पोलिस ठाण्यात एमजी हेक्टर या वीस लाख रुपये किंमतीच्या गाडीचा अपहार झाल्याचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना सुफीयान चौहान याने हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. मध्यप्रदेश येथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने ती गाडी अवैध व्यवसायात वापर करण्यासाठी बाडमेर राजस्थान येथील एका व्यक्तीला विक्री केल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथून ही गाडी ताब्यात घेतली. तसेच त्याच्याकडून त्याने अशाचप्रकारे अपहार केलेल्या पुण्यातील दोन गाड्या जप्त केल्या.

आरोपी हा त्याच्या किंवा मित्राच्या बँक खात्याद्वारे पैसे पे करून झुमकार अ‍ॅपवरून गाड्या लंपास करून राजस्थान येथे अवैध धंद्यात वापरण्यासाठी विक्री करत होता. त्याने मुंबई आणि पुण्यातून गाड्यांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, मनीषा पाटील, पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, दिलीप पालवे कर्मचारी अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, सुभाष आव्हाड, सुरज जाधव, विकास कदम यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

रायगड: भावाला वाचविताना लहान भावाचा कुंडात बुडून मृत्यू

‘जूनो’ने टिपली गुरूच्या ‘ज्वालामुखीग्रस्त’ चंद्राची प्रतिमा

काळजी घ्या…व्हायरल इन्फेक्शनचे वाढले रुग्ण

Back to top button