वॉशिंग्टन : गुरू आणि शनीचे अनेक चंद्र आहेत. त्यापैकी अनेक चंद्र वेगवेगळ्या कारणांमुळे वैशिष्ट्यपूर्णही बनलेले आहेत. गुरूच्या एका चंद्राचे नाव 'आयओ' असे आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'चे एक जोवियन सॅटेलाईट त्याच्या अतिशय जवळ गेले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून गुरूभोवती फिरत असलेले 'नासा'चे 'जूनो' नावाचे यानही अलीकडेच 'आयओ'पासून केवळ 13,700 मैल अंतरावरून गेले. इतक्या जवळून जात असताना त्याने या चंद्राचे जे छायाचित्र टिपले ते थक्क करणारेच आहे. 'जूनो' वर लावलेल्या 'जूनोकॅम' या शक्तिशाली कॅमेर्याने ते 30 जुलैला टिपले होते. 'आयओ' हा चंद्र उद्रेक होत असलेल्या अनेक ज्वालामुखी आणि लाव्हा रसाने भरलेला आहे. त्याचेच प्रतिबिंब या छायाचित्रात दिसते!
तज्ज्ञांनी इमेज प्रोसेसिंगच्या सहाय्याने 'आयओ'च्या प्रतिमांमध्ये सुधारणा केल्या व त्या 'नासा'ने आपल्या मिशन वेबसाईटवर शेअर केल्या. ही छायाचित्रे 'आयओ'ची आतापर्यंत टिपलेल्या छायाचित्रांपैकी सर्वात चांगली छायाचित्रे आहेत. 'नासा'ने म्हटले आहे की आपल्या सौरमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेला गुरू आणि त्याचे काही मोठ्या आकाराचे चंद्र यूरोपा व गेनीमेड आपल्या गुरुत्वाकर्षणाने या 'आयओ'ला खेचत असतात.
त्याचा परिणाम म्हणून तो नेहमी ताणतो व आकुंचित होत असतो. त्याच्या पृष्ठभागावर सातत्याने निर्माण होणार्या ज्वालामुखी आणि लाव्हा उद्रेकाच्या घटनांसाठी ही क्रिया जबाबदार असते. छायाचित्रात 'आयओ'च्या पृष्ठभागावर जे काळे डाग दिसत आहेत त्यापैकी अनेक त्याच्या ज्वालामुखीचे लाव्हा क्षेत्र आहेत. याच वर्षाच्या सुरुवातीस संशोधकांनी तिथे ताजा लाव्हा रस पाहिला होता. 'जूनो'च्या आधी 2007 मध्ये 'न्यू होरिझन्स'ने त्याचे निरीक्षण केले होते.