सांगली : वारणावती वसाहतीत बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण | पुढारी

सांगली : वारणावती वसाहतीत बिबट्याचे दर्शन नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

वारणावती; पुढारी वृत्तसेवा : वारणावती (ता. शिराळा) येथील नागरी वसाहतीमध्ये करमणूक केंद्राजवळ आज (दि. ७) संध्याकाळी सहाच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे आढळून आले. हा बिबट्या मुक्तपणे वावरताना दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी येथील अमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळील पाळीव कुत्र्याला बिबट्याने भक्ष केले होते. त्यावेळी येथील सीसीटीव्ही कॅमेरात तो कैद झाला होता. त्यामुळे वसाहतीत बिबट्याचं अस्तित्व अधोरेखित झाले होते. आज पुन्हा येथील करमणूक केंद्राजवळील झाडावर तो मुक्तपणे वावरत असताना नागरिकांनी पाहिले अनेकांनी आपल्या मोबाईलद्वारे फोटो काढले. येथील वनक्षेत्रपाल नंदकुमार नलावडे यांना माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली.

वारणावती वसाहतीमध्ये बिबट्याचं वारंवार दर्शन होत आहे त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्यातच वारंवार वीज वितरण कंपनी विज बिल भरले नसल्याचे कारण पुढे करून येथील वीज पुरवठा खंडित करते. त्यामुळे येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागते.

दिवसाढवळ्या बिबट्या नागरी वस्तीत फिरत असल्यामुळे येथील नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Back to top button