

दापोडी : महापालिकेच्या क्षेत्रात रस्त्यावर फिरणार्या मोकाट जनावरांचा त्रास कमी व्हावा यासाठी महापालिकेकडून विविध योजना राबविल्या जातात. मात्र प्रत्यक्षात कृती न झाल्याने आजही शहरात मोकाट जनावरे रस्त्यावर दिसून येत असून, त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या मोकाट जनावरांनी आपल्या मागण्यासाठी जणू काही मुख्य चौकामध्ये ठिय्या आंदोलन केल्याचे चित्र दिसून येत आहे.
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सांगवी, नवी सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. जनावरांच्या उपद्रवामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. ही जनावरे मुख्य चौक पाहून त्या ठिकाणी आपला ठिय्या मांडतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
अपघाताची भीती
महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात मोकाट जनावरे रस्त्यावर फिरत असतात. तसेच, रस्त्याच्याकडेला बसलेली दिसतात. रस्त्याच्याकडेला बसणार्या या प्राण्यांना प्राणीप्रेमी खायलाही आणून देतात. तर, काही खासगी मालकांच्या गायी, बैलही रस्त्यावर फिरताना दिसतात. मोकाट जनावरांबाबत पालिकेने उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवले जात असून, शहर सुंदर कसे दिसेल याबाबत सर्वसामान्य नागरिकांना सूचना केल्या जात आहेत. प्रत्यक्षात पालिकेकडून उपाययोजना प्रभावीपणे का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. अनेक खासगी मालक आपल्या गायी-बैलांना सरळ रस्त्यावर सोडून देत असल्याने त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा :