दिवेतील झेंडेंच्या सरदार पेरूची चवच न्यारी

दिवेतील झेंडेंच्या सरदार पेरूची चवच न्यारी

दिवे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यातील दिवे गाव हे फळबागांचे आगार म्हणून अग्रेसर ठरत आहे. येथील असंख्य शेतकरी अंजीर, सीताफळासह पेरूचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत. यापैकीच काळेवाडीमधील गणेश झेंडे आणि सविता झेंडे या दाम्पत्यांच्या सरदार (गावरान) जातीच्या पेरूच्या चवीची चर्चा तालुक्यात होऊ लागली आहे. त्यांच्या बागेतील पेरूचा रंग, आकार, चव इतर पेरूच्या तुलनेने भिन्न असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. सध्या त्यांची प्रयोगशील पेरू बाग परिसरातील शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

झेंडे दाम्पत्याने वडिलोपार्जित 10 गुंठे क्षेत्रावर पेरूच्या सरदार जातीच्या अवघ्या 60 झाडांची लागवड केली आहे. या पेरू बागेमध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. जेसीबीच्या साहाय्याने खड्डे घेऊन त्यात शेणखत, बुरशीनाशकाचा वापर केला. त्यानंतर रोपांची लागवड केली. लागवडीनंतर दोनच वर्षात प्रत्यक्ष फळधारणा झाली. या भागात पेरूला सुरुवातीलाच माशीचा प्रादुर्भाव जास्त होता. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी आपल्या पेरूच्या बागा काढून टाकल्या. परंतु झेंडे दाम्पत्याने जास्तीत जास्त शेणखताचा वापर करून बाग दर्जेदार बनवली. फळधारणा झाल्यानंतर योग्य वेळी औषध फवारणी करत बाग वाचवली.

सध्या पेरूचे दर्जेदार उत्पादन निघत आहे. गावरान जातीचा पेरू आकाराने लहान आहे. मात्र चवीला आंबट-गोड असल्याने ग्राहकांकडून विशेष मागणी होत आहे. स्थानिक बाजारामध्ये या पेरूला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या सासवड बाजार व पुण्यातील व्यापारी बागेत येऊन पेरू खरेदी करत आहेत. 20 किलोचे एक कॅरेट एक हजार रुपयांपर्यंत विकले जात आहे. 10 गुंठे क्षेत्रावर आतापर्यंत तब्बल दीड टनापर्यंत उत्पादन मिळाले असून, अजून दोन टनांपर्यंत उत्पादन मिळण्याचा अंदाज झेंडे दाम्पत्याने व्यक्त केला आहे. पेरू बाग जगविण्यात झेंडे दाम्पत्यांना त्यांची मुले सौरभ व गोवर्धन झेंडे आणि सुना चैत्राली व मयूरी झेंडे यादेखील मदत करत आहेत.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news