राज्यातील 43 धरणांत निम्म्यापेक्षा कमी पाणी | पुढारी

राज्यातील 43 धरणांत निम्म्यापेक्षा कमी पाणी

शिवाजी शिंदे

पुणे : जून महिना पूर्णपणे कोरडा, तर जुलै महिन्यात ठरावीक दिवसच मध्यम ते मुसळधार या प्रकारात पावसाने राज्यात हजेरी लावली असली, तरी बहुतांश धरणे मात्र कोरडीच आहेत. राज्यातील एकूण मोठे पाणीसाठे असलेल्या धरणांपैकी केवळ 100 धरणांमध्ये 50 टक्क्यांहून अधिक, तर 43 धरणांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आतापर्यंत साठलेला आहे. विशेष म्हणजे शून्य टक्के पाणीसाठा असलेली धरणांची संख्या दहाहून अधिक आहे. त्यामध्ये बुलडाणा,धाराशिव, नांदेड, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांतील धरणांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यातील सहा विभागांतील धरणांमध्ये केवळ 59.23 टक्केच पाणीसाठा आहे.

जलसंपदा विभागाच्या नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागांत 2 हजार 994 धरणे आहेत. मात्र, यापैकी कोकण भागात असलेल्या धरणांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडला. त्यामुळे ही धरणे 90 टक्क्यांहून अधिक भरली आहेत. या उलट मराठवाड्यातील छ. संभाजीनगर विभागात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे या भागात असलेल्या धरणांच्या पाण्याने तळ गाठला आहे. किंबहुना, केवळ मृतसाठाच शिल्लक राहिला आहे. अमरावती भागातील धरणांची अवस्थादेखील दयनीय आहे. नागपूर विभागात पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावली आहे.

मात्र, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने या भागातील धरणे 50 ते 70 टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत. नाशिक भागात तिसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी, या धरणातील पाणीसाठा शून्य टक्के झाला आहे. पुणे विभागात केवळ खडकवासला, चासकमान, राधानगरी अशा मोजक्याच धरणांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात अजूनही तीस ते पस्तीस टक्के पाणी धरण भरण्यासाठी कमी आहे. राज्यात सर्वांत मोठे असलेल्या ‘उजनी’ धरणात आता केवळ 1.98 टक्के पाणीसाठा आहे.

राज्यात ऑगस्ट महिना सुरू झाला, तरी सलग दमदार पाऊस पडला. कित्येक विभागातील बहुतांश जिल्हे कोरडे आहेत. त्या भागात अक्षरश: टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ स्थानिक प्रशासनावर आली आहे. पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली नाही तर राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. याकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

राज्यातील सहा विभागांतील धरणांचा पाणीसाठा (टक्केवारीत)
विभाग………………….आजचा………………….मागील वर्षी
नागपूर………………….68.63………………….69.03
अमरावती………………64.60………………….81.77
छ. संभाजीनगर………….30.95………………….66.06
नाशिक…………………52.94………………….66.66
पुणे…………………….64.82………………….76.20
कोकण…………………84.68………………….80.69
एकूण………………..59.23………………..71.90 टक्के

100% भरलेली धरणे

जिल्हा……..धरणाचे नाव
पालघर…….कवडज
ठाण……….मोडकसागर, तानसा
भंडारा……..असोलामेंढा
गडचिरोली….दिना
नाशिक……..भाम, भवाली
कोल्हापूर….. राधानगरी
पुणे………..खडकवासला, चासकमान

0% असलेली धरणे

जिल्हा………..धरणाचे नाव
बुलडाणा……..बोरगाव,अंजनपूर, शिरसमार्ग
नांदेड………..अमदुरा, दिगडी
धाराशिव……..लिंबाला, सिनाकोळेगाव
लातूर………..खडकपूर, नागझरी
नाशिक……….तिसगाव

राज्यातील 100 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा
0 ते 50 टक्के पाणीसाठा झालेली 43 धरणे
सलग मोठा पाऊस न पडल्यास दुष्काळी स्थितीची भीती
पावसाचा थेंबथेंब साठवण्याची गरज

हेही वाचा

नगर : मुलीला पळवून नेणार्‍याला चोवीस तासांत पकडले

दिलीप प्रभावळकर-रोहिणी हट्टंगडीचा इच्छामरणावर पहिलाच चित्रपट

नगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ; एलसीबीकडून युवक अटकेत

Back to top button