

नगर : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून ते सोशल मीडियावर व्हायरल करणार्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि. 5) तत्काळ अटक केली. अरमान नईम शेख (रा. मुकुंदनगर) असे आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या युवकाचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत बोलून ते रेकॉर्डिग युवकाने सोशल मीडियावर व्हायरल केले. ही क्लिप व्हायरल होताच संबंधित अरमान याला एका व्यक्तीने फोन केला असता त्यानेे पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केले.
जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांना या आक्षेपार्ह क्लिपची माहिती मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करत सदरची ऑडिओ क्लिप करणार्या अरमान शेख याला तासाभरातच नगर शहरातून ताब्यात घेतले. त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, भिंगार पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवार (दि.9) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध
शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या युवकावर कठोर कारवाई करण्याची व यामागील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी अब्दुस सलाम खोकर, हाजी शौकत तांबोळी, हाजी मन्सूर शेख, नगरसेवक समद खान, मुजाहिद (भा) कुरेशी आदी उपस्थित होते.
हेही वाचा :