इथेनॉल प्रकल्प राबवा, हवी तेवढी मदत देऊ; अमित शहा यांची ग्वाही | पुढारी

इथेनॉल प्रकल्प राबवा, हवी तेवढी मदत देऊ; अमित शहा यांची ग्वाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा : छोट्या स्वरूपातील गुंतवणुकीच्या आधारे मोठे कार्य उभारण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले आहे. गरिबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले आहे. आता महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प हाती घ्यावेत. त्यांना हवी तेवढी आर्थिक मदत देण्यास केंद्र तयार आहे, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे दिली.

केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या (सीआरसीएस) डिजिटल पोर्टलचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते चिंचवड येथील रामकृष्ण मोरे बहुउद्देशीय हॉलमध्ये रविवारी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार, विशेष सचिव तथा केंद्रीय निबंधक विजय कुमार, राज्याचे सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते. डिजिटल पोर्टलचा सर्वाधिक लाभ देशात सर्वात जास्त बहुराज्य सहकारी संस्था असलेल्या महाराष्ट्राला होईल. बहुराज्य सहकारी संस्थांचे कामकाज पाहणार्‍या केंद्रीय सहकार निबंधकांचे कामकाज पूर्णत: डिजिटल होत आहे. ते 95 टक्के पूर्ण झाल्याचे शहा यांनी सांगितले.

केंद्र सरकारने देशात आता पुढील पाच वर्षांत तीन लाख नव्या विकास सोसायट्या स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांच्या संगणकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी या कार्यक्रमात दिली. प्रास्ताविकात विशेष सचिव विजय कुमार म्हणाले, प्रलंबित असलेला बहुराज्य सहकारी संस्था कायदा (एमएससीएस अ‍ॅक्ट) हा 2 ऑगस्टपासून लागू झाला आहे. या अधिनियमाशी निगडित नियम 4 ऑगस्टपासून लागू करण्यात आले असून, आज त्याविषयीच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात येत आहे.

या वेळी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने सहकार मंत्री अमित शहा यांचा विशेष सत्कार महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच या डिजिटल पोर्टलसाठी योगदान दिलेल्या विद्यार्थ्यांनाही शहा यांनी विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविले. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा

छत्रपती संभाजीनगर : डॉक्टर, पोलिसांवर जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

गोवा : बाणास्तरी येथे कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

Earthquake : अफगाणिस्तानला पुन्हा भुकंपाचे धक्के

Back to top button