परभणी: सेलू रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून साईबाबांच्या गुरूंची ओळख जगापुढे येईल: आमदार मेघना बोर्डीकर | पुढारी

परभणी: सेलू रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून साईबाबांच्या गुरूंची ओळख जगापुढे येईल: आमदार मेघना बोर्डीकर

सेलू , पुढारी वृत्तसेवा : सेलू शहर श्री संत साईबाबांचे गुरु श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांचे जन्मस्थान आहे. ऊर्जा स्थान आहे. या देशात सेलू रेल्वे स्थानकांचे नाव झाले पाहिजे. श्री संत साईबाबांचे गुरु श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांची ओळख यापुढे सेलु रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून संपूर्ण जगापुढे येईल, असे प्रतिपादन आमदार मेघना बोर्डीकर यांनी आज (दि.६) केले.

अमृतभारत स्टेशन योजनेअंतर्गत सेलू  रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी समारंभप्रसंगी आमदार बोर्डीकर बोलत होत्या.
यावेळी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विनायकराव कोठेकर, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, भाजपचे शशिकांत देशपांडे, उद्योगपती जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनारायण मालानी, लक्ष्मण बुधवंत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी देविदास जाधव, नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड, वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिकल इंजिनियर हेमा नायक, सेलू रेल्वे स्थानक प्रमुख सोमनाथ राऊत, मुख्य तिकीट निरीक्षक प्रदीप जोहिरे, मुख्य वाणिज्य पर्यवेक्षक राजेश मिना, मुख्य अभियंता विनोद आर्या आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील नऊ वर्षाच्या कार्यकाळात मोठी विकासकामे केली आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून देशातील रस्ते विकसित झाले आहेत. त्याचबरोबर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव व रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून संपूर्ण देशभर रेल्वेचे जाळे विकसित होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली, तरी देशातील काही भागात रस्ते, रेल्वे, वीज पोहोचलेली नव्हती. मात्र, ते पोहोचविण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. रोटी, कपडा, मकान याही पुढे जाऊन तरुणांचे भविष्य घडविण्याचे काम तसेच शेतकरी, महिला व तरुण यांचे सक्षमीकरणाचे काम पंतप्रधान करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button