पुणे रेल्वे स्थानकात घुसखोरी करणार्‍यांना दणका

पुणे रेल्वे स्थानकात घुसखोरी करणार्‍यांना दणका
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्थानकावर घुसखोरी करणार्‍यांवर आणि फुकट्या लोकांवर रेल्वेच्या सर्व यंत्रणांकडून शनिवारी (दि. 4) कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दै. 'पुढारी'च्या बातमीनंतर रेल्वेची यंत्रणा खडबडून जागी झाली असून, कारवाईदरम्यान अनेकांना ताब्यात घेण्यात आले, तर काहींना दंड करण्यात आला. बर्‍याच दिवसांपासून ठाण मांडून बसलेल्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांसह लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा बल यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती. अशी कारवाई आता दररोज होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी साडे-पाचच्या सुमारास दोन जणांनी फ—ी स्टाईल हाणामारी केली. ही घटना दै. 'पुढारी'च्या प्रतिनिधीसमोरच घडली होती. त्या संदर्भात दै. 'पुढारी' मध्ये शनिवारी (दि. 5) 'रेल्वे प्लॅटफॉर्मवर गुंडाराज' असे वृत्त सचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत, मध्य रेल्वेची सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. तसेच, लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाची यंत्रणादेखील जागी झाली.

त्यांनी बातमीची दखल घेत शनिवारी संयुक्त मोहीम हाती घेत घुसखोरी करणार्‍या नागरिकांवर धडक कारवाई केली. ही कारवाई रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशन डायरेक्टर मदनलाल मीना, लोहमार्ग पोलिस विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक बी. एस. रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या वेळी त्यांच्यासोबत रेल्वे तिकीट निरीक्षक देखील उपस्थित होते.

मनुष्यबळ नसल्याने सुरक्षा यंत्रणा हताश…

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकाची सुरक्षा वार्‍यावर आहे. पुणे रेल्वे स्थानक 'आओ जाओ घर तुम्हारा' असे बनले आहे. मनुष्यबळ नसल्यामुळे रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसदेखील हाताश झाले आहेत. त्यातच भर म्हणजे पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यासाठी अतिरिक्त मार्ग आहेत. त्यामुळे काही नागरिक अनधिकृतरीत्या स्थानकात त्या मार्गांनी घुसखोरी करून प्रवाशांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच चोर्‍या-मार्‍याही करत आहेत. दै. 'पुढारी' कडून याबाबत सातत्याने वृत्त प्रसिद्ध करण्यात येत आहे. स्थानकावर पाहणी सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी 'पुढारी'च्या प्रतिनिधीसमोरच ही घटना घडली अन् पुन्हा एकदा रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

सशस्त्र पोलिसांचा 24 तास पहारा हवा

विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानांप्रमाणे पुणे रेल्वे स्थानकावरदेखील सशस्त्र पोलिसांचा पहारा असणे आवश्यक आहे. मात्र येथे अनेकदा एकही सुरक्षारक्षक पाहायला मिळत नाही. त्यामुळे अशा घटना घडल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच तिकीट निरीक्षकांकडूनदेखील व्यवस्थितरीत्या प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी होत नसल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे असे नागरिक येथे सर्रासपणे घुसखोरी करत आहेत. ती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मिळालेल्या माहितीनुसार हाणामारी करणार्‍या दोघांवर रेल्वे अ‍ॅक्ट नुसार कडक कारवाई करण्यात आली आहे. त्यासोबतच संयुक्त मोहीम हाती घेत घुसखोरांवर आणि फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे.

– इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक,पुणे विभाग

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news