Pune News : देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोटाचा होता कट | पुढारी

Pune News : देशातील प्रमुख शहरांत बॉम्बस्फोटाचा होता कट

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जगभरातील दहशतवादी हल्ल्यांची माहिती घेऊन देशाच्या प्रमुख शहरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा त्यांचे तांत्रिक ज्ञान अतिशय उच्च दर्जाचे असल्याचा अहवाल राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात सादर केला आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी दहशतवाद्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती एटीएसने न्यायालयाला केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयाने ती मंजूर करत चार दहशतवाद्यांच्या कोठडीत 11 ऑगस्टपर्यंत वाढ केली.

महंमद युनूस महंमद याकूब साकी (24), महंमद इम्रान महंमद युसूफ खान (23), अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (32), सिमाब नसरुद्दीन काझी (27) अशी कोठडीत वाढ करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. शनिवारी (दि. 5) त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेले साहित्य तांत्रिक विश्लेषणासाठी पुणे व मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. त्यांपैकी काही साहित्याचे विश्लेषण झाले असून, त्याच्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र मोड्यूल प्रकरणी काही जणांना अटक केली.

दोन्हींतील आरोपी हे एकमेकांच्या संपर्कात होते. हे दहशतवादी वेगवेगळी नावे धारण करून एकमेकांशी संपर्क साधत होते. त्यांनी बॉम्ब बनविण्याचे आणि त्याचे प्रात्यक्षिक करण्याचे काम सोबत मिळून केलेले आहे. दहशतवाद्यांनी केलेला गुन्हा हा देशाचे सार्वभौमत्व व सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर स्वरूपाचा आहे. त्यात अनेकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील विजय फरगडे यांनी केली. यावेळी बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. यशपाल पुरोहित यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने चारही जणांच्या कोठडीत 11 ऑगस्टपर्यंत वाढ केली.

आधार कार्डआधारे संवेदनशील रसायनांची खरेदी

देशात बंदी नसलेल्या, मात्र निर्बंध असलेल्या काही रसायनांची व संवेदनशील पदार्थांची खरेदीही दहशतवाद्यांकडून करण्यात आली. या प्रकारच्या वस्तूंची खरेदी करताना आधार कार्ड देणे सक्तीचे असते. त्यानुसार त्यांनी आधार कार्ड देऊन या वस्तू खरेदी केल्या आहेत. ज्या ठिकाणाहून त्या वस्तू खरेदी केल्या, त्या दुकानांची ओळख पटविली आहे.

घातपाती कारवायांच्या ठिकाणांची माहिती न्यायालयात

दहशतवाद्यांकडून देशभरातील काही ठिकाणांचे नकाशे जप्त करण्यात आले आहे. त्यांपैकी एक नकाशा शनिवारी न्यायालयात सादर करण्यात आला होता. त्यात देशातील एका शहरात कधी, केव्हा घातपात करायचा, याची तयारी करण्यात आली होती याची माहिती न्यायालयापुढे सादर करण्यात आली.

हेही वाचा

‘जयप्रभा’ चित्रपट महामंडळाकडे हस्तांतरित करण्याची गरज

एमपीएससी करणार्‍या तरुणाने मागितली दहा लाखांची खंडणी

गावे बहरणार, हिरवाईने नटणार

Back to top button