अमित शहा पुण्यात; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चेची शक्यता | पुढारी

अमित शहा पुण्यात; मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चेची शक्यता

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा दीड दिवसांच्या दौर्‍यासाठी शनिवारी सायंकाळी पुण्यात दाखल झाले. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही पुण्यात असल्याने त्यांच्यामध्ये राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार तसेच अन्य राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमित शहा सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दिल्लीवरून लोहगाव विमानतळ येथे दाखल झाले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शंभुराजे देसाई, माजी खासदार संजय काकडे यांनी विमानतळावर शहा यांचे स्वागत केले.

त्यानंतर अमित शहा त्यांच्या नातेवाइकांच्या भेटीला मार्केट यार्ड परिसरात गेले. तेथून ते साडेनऊच्या सुमारास एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेले. शहा यांच्याकडे केंद्रीय सहकार खातेही असून, ते रविवारी पिंपरी येथे आयोजित सहकार परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याव्यतिरिक्त दिवसभर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांशी त्यांच्या भेटीगाठी होणार आहेत. दरम्यान, याच वेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्रीही पुण्यात असल्याने राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार तसेच अन्य राजकीय घडामोडींवर आणि संघटनेच्या बांधणीसंदर्भात चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

‘जयप्रभा’ चित्रपट महामंडळाकडे हस्तांतरित करण्याची गरज

एमपीएससी करणार्‍या तरुणाने मागितली दहा लाखांची खंडणी

गावे बहरणार, हिरवाईने नटणार

Back to top button