गुंडेगाव प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत धोकादायक! | पुढारी

गुंडेगाव प्राथमिक शाळेची जीर्ण इमारत धोकादायक!

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील प्राथमिक शाळेच्या इमारती जीर्ण अवस्थेत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी संभाव्य धोका लक्षात घेऊन शिक्षण विभागाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. सर्व शिक्षा अभियानांतर्गत गावातील प्राथमिक शाळांच्या इमारती नवीन बांधण्यात आल्या. त्यामुळे गुंडेगाव भागातील विद्यार्थी शाळेच्या नवीन इमारतीत शिक्षण घेत आहे. परंतु, जुन्या झालेल्या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरणार आहेत. याकडे मात्र, शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जुन्या जीर्ण इमारती तत्काळ पाडण्याची मागणी आहे.

काही वर्षांपूर्वी शासनाने सर्व शिक्षा अभिायानांतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातील शाळांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून नवीन इमारतींचे बांधकाम केले. विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले, तरी लगतच्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. भिंतीवर भेगा पडल्या आहेत. साप, विंचू आदी सरपटणार्‍या प्राण्यांचा मुक्त संचार असतो. पावसाने जीर्ण इमारती पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत तत्काळ जुन्या जीर्ण इमारती पाडाव्यात, मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा :

सातारा : अतिउत्साह बेततोय पर्यटकांच्या जीवावर; रिल्समुळे जीव येतो धोक्यात

पुणे : शंभर रुपयांसाठी खून करणार्‍या भाच्याला अटक

Back to top button