पुणे : ग्रामीण भागात डोळ्यांच्या साथीचा प्रसार सुरूच

पुणे : ग्रामीण भागात डोळ्यांच्या साथीचा प्रसार सुरूच
पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चौदा हजारांहून अधिक नागरिकांना डोळ्यांचा संसर्ग झाला आहे. यापैकी ग्रामीण भागातच दहा हजार रुग्ण आढळले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण दोन ते तीनपटीने जास्त असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत बाधित व्यक्तींपैकी सुमारे 9 हजार जण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात आळंदी परिसरातून डोळे येण्याची लागण सुरू झाली. आळंदी हा साथीचा उद्रेक झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. हळूहळू ही लागण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पसरली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्येही बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालामध्ये पुणे शहरामध्ये 1,052, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 3,047 जणांना डोळे येणे संसर्गाची बाधा झाल्याचे नमूद केले आहे.
तर ग्रामीण भागातील बाधित नागरिकांची संख्या दहा हजारांपर्यंत पोहोचली आहे. शाळा, अंगणवाडी, वसतिगृहे व अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी डोळे येणे संसर्गाची लक्षणे आढळून येऊ लागली आहेत. त्यामुळे या ठिकाणी असलेली मुले किंवा व्यक्ती यांना वेगळे ठेवावे जेणेकरून त्यांचा इतरांशी संपर्क येणार नाही, अशा सूचना त्यांच्या व्यवस्थापनाला आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
डोळे येणे हा संसर्ग प्रामुख्याने पावसाळ्यात होतो. डोळे येणे हा सौम्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग असला, तरीदेखील याबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. संसर्ग झालेला रुग्ण पाच ते सहा दिवसांमध्ये पूर्णपणे बरा होतो. मात्र, या संसर्गाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
– डॉ. रामचंद्र हंकारे, 
जिल्हा आरोग्य अधिकारी.
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news