खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन बहीण-भावाचा मृत्यू; गाडेकरवाडी येथील घटना | पुढारी

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन बहीण-भावाचा मृत्यू; गाडेकरवाडी येथील घटना

संतोष वळसे पाटील

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील गंगापूर खुर्द गावातील गाडेकरवाडी येथे ओढ्याच्या पाण्यात बुडून अल्पवयीन सख्या बहिण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आर्यन अरुण काळे (वय ११) आणि अंजली अरुण काळे (वय १५) अशी मृत भावंडांची नावे आहेत. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शुक्रवार (दि.४) सकाळी करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत आदित्य जाधव यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या घटनेबाबत घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.३) ही भावंडे गाडेकर वाडी येथे वरसुबाई मंदिराच्या शेजारी ओढ्यात खेकडे पकडण्यासाठी गेले होते. ते बराच वेळ होऊनही घरी न आल्याने त्यांचा शोध घेतला असता ते ओढ्यात मृत अवस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढले असता त्यांचा श्वास बंद होता. मंचर येथील रुग्णवाहिका चालक गौरव बारणे यांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना रुग्णवाहिकेतून गुरुवारीच रात्री साडेआठ वाजता घोडेगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शुक्रवार (दि.४) सकाळी दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बहिण-भावांचा झालेला मृत्यू कशामुळे याचा शोध पोलीस घेत आहे. या प्रकरणाचा तपास घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वागज करत आहे.

हेही वाचा

सा रे ग म प लिटिल चॅम्प : संगीताने मला निवडलं आहे-वैशाली माढे

झगडे फाटा- वडगावपान फाटा नॅशनल हायवेला वर्ग करावा : आ. आशुतोष काळे

महासागरातील सर्वात मोठे आक्रमक शिकारी

Back to top button