महासागरातील सर्वात मोठे आक्रमक शिकारी | पुढारी

महासागरातील सर्वात मोठे आक्रमक शिकारी

लंडन : शार्क म्हटलं की अनेकांच्या हृदयात धडकी भरत असते. त्यामध्येही ग्रेट व्हाईट शार्कची मोठीच दहशत असते. हे समुद्रातील अत्यंत आक्रमक शिकारी मासे आहेत. मात्र, त्यांच्यापेक्षाही मोठ्या आकाराचे आणि अत्यंत आक्रमक शार्क 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. त्यांचे नाव ‘मेगालोडोन शार्क’ असे आहे. 30 लाख वर्षांपूर्वी ही प्रजाती नष्ट झाली. तोपर्यंत पृथ्वीवरील महासागरांमध्ये या शार्कचाच दबदबा होता.

माणसाला या शार्कचा कधीही सामना करावा लागला नाही, याचे कारण म्हणजे आधुनिक मानव विकसित होण्यापूर्वीच ते नामशेष झाले होते. ते आतापर्यंतचे सर्वात मोठ्या आकाराचे शार्क मासे आहेत. तसेच समुद्रातील सर्वात मोठे आक्रमक शिकारीही आहेत. अलीकडच्या काळात या शार्कबाबत मोठे संशोधन झाले. तसे पाहता सन 1840 च्या दशकापासूनच विज्ञानाला त्यांची माहिती होती. त्यांचे त्रिकोणी व मोठ्या आकाराचे दात त्यावेळी सापडले होते. त्यावरूनच त्यांना ‘मेगालोडोन’ असे नाव देण्यात आले. प्राचीन ग्रीक भाषेत या शब्दाचा अर्थ ‘मोठे दात’ असा होतो. या प्रजातीला ‘कॅर्चारोडोन मेगालोडोन’ असे वैज्ञानिक नाव आहे.

आधुनिक काळातील ग्रेट व्हाईट शार्कच्या कुळातच त्यांना ठेवलेले आहे. मात्र, सध्या त्यांना ‘ओटोडस मेगालोडोन’ या नावाने वर्गीकृत केले जाते. त्यांचे दात 16.8 सेंटीमीटर लांबीचेही होते. सध्याच्या ग्रेट व्हाईट शार्कचे दात 7.5 सेंटीमीटर लांबीचे असतात. काही संशोधनांनुसार हे मासे 59 फूट ते 66 फूट आकारांचेही होते. शिकागोतील डीपॉल युनिव्हर्सिटीतील केन्शू शिमादा यांनी म्हटले आहे की या शार्कच्या वरच्या जबड्यातील पुढचे दात हे त्यांच्या शरीराच्या लांबीचा अंदाज करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यानुसार या माशांची लांबी 50.2 फूट असावी.

संबंधित बातम्या
Back to top button