अबब...!! पंधराशे क्रेट टोमॅटो विकले १५ लाखांना, मांजरेवाडीचे शेतकरी अरविंद मांजरे कुटुंबाची मेहनत फळाला | पुढारी

अबब...!! पंधराशे क्रेट टोमॅटो विकले १५ लाखांना, मांजरेवाडीचे शेतकरी अरविंद मांजरे कुटुंबाची मेहनत फळाला

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: सध्या टोमॅटोला चांगले दर मिळत असल्याने ज्याच्याकडे टोमॅटो आहेत, ते शेतकरी मालामाल होत आहेत. एका एकरातले एक हजार पाचशे क्रेट टोमॅटो बाजारात नेले आणि १५ लाख रुपये मिळाल्याने लॉटरी लागल्याचा अनुभव खेड तालुक्याच्या मांजरे वाडी येथील शेतकरी अरविंद मांजरे आणि परिवाराला आला आहे. अनेक वर्षांनंतर कष्टाचे चीज झाल्याची भावना घरातील प्रत्येक सदस्याची आहे.

गेली कित्येक वर्षे भाव नसल्याने टोमॅटो शेताच्या बांधावर अथवा रस्त्यावर फेकल्याचे प्रकार घडले आहेत. आर्थिक लाभाची आस धरुन काबाड कष्ट करणाऱ्या अश्या कुटुंबांना हे वर्ष मात्र चांगले गेले आहे. या वर्षी टोमॅटो पिकाला चांगला भाव मिळाला असून उत्पादक शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

पावसाळा सुरू झाला आहे. त्यापुर्वी आणि सुरू झाल्यावर असे गेले दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचा भाव वाढलेला आहे. दरवर्षी तोटा होत असताना देखील शेतकऱ्यांनी भाजीपाला, टोमॅटो पिक घेण्याचे धाडस केले. सातत्य राखून प्रामाणिकपणे प्रयत्न व कष्ट करणारे असे शेतकरी आज लखपती झाले आहेत. एप्रिल, मे महिन्यात लागवड केलेले टोमॅटो, भाजीपाला पाऊस सुरू झाला की बहुतेक वेळा करपा व इतर रोगांच्या प्रादुर्भावात खराब होतात. या संकटांवर मात करून खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्म) येथील शेतकरी अरविंद मांजरे यांनी एक एकरावर टोमॅटोची लागवड केली .त्यावेळी टोमॅटो दोन-तीन रुपये किलोने विकले जात होते. पुढील भावाचा विचार न करता या शेतकऱ्याने टोमॅटोची लागवड केली. सुरुवातीला कमी भाव मिळाला, पण नंतर मात्र त्यांचे नशीब फळफळले. एक एकरात टोमॅटोला दीड लाखापर्यंत खर्च केलेला असताना आजपर्यंत त्यांना एक एकर टोमॅटोतून १५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. सुरुवातीला पंधरासे ते सतरासे रुपये दर मिळालाच तो पुढे वाढत वाढत जाऊन दोन हजार रुपये कॅरेटपर्यंत मिळाला. आतापर्यंत पंधराशे कॅरेटचे उत्पादन निघाले.

हेही वाचा:

होळच्या ढगाई मंदिरात चोरी करणारा गजाआड ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी 

शेटफळगडे : विहिरीत गाडलेल्या मजुरांपैकी अद्याप एकही मजूर सापडला नाही

उरुळी कांचन रेल्वे स्थानकाला उपनगरीय रेल्वेसेवेचा दर्जा केव्हा?

 

Back to top button