होळच्या ढगाई मंदिरात चोरी करणारा गजाआड ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी  | पुढारी

होळच्या ढगाई मंदिरात चोरी करणारा गजाआड ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी 

बारामती : पुढारी वृत्तसेवा : होळ (ता. बारामती) येथील ढगाई मंदिरात आषाढातील यात्रेत गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील मिनीगंठण चोरणाऱया चोरट्याला पकडण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. योगेश बालाजी कांबळे (वय १९, रा. नूर कॉलनी, शिवनी रोड गांधीनगर, बीड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. वडगाव निंबाळकर येथील महिला ढगाई देवीच्या दर्शनाला गेली असताना हा प्रकार घडला होता. ती मंदिरात दर्शन घेत असताना पाठीमागून ढकलाढकली सुरु होती. या गर्दीचा फायदा घेत कांबळे याने तिच्या गळ्यातील मिनी गंठण चोरून नेले होते. विशेष म्हणजे मंदिराच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली होती. या प्रकरणी अज्ञाताविरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात होता. गोपनिय बातमीदाराकडून त्यांना कांबळे याने ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांचे पथक आणि वडगावचे सपोनि सचिन काळे यांनी केली.
हेही वाचा : 

Back to top button