Namdeo Dhondo Mahanor | ‘रानकवी’ ना. धों. महानोर काळाच्या पडद्याआड ; पळसखेडला होणार अंत्यसंस्कार

Namdeo Dhondo Mahanor | ‘रानकवी’ ना. धों. महानोर काळाच्या पडद्याआड ; पळसखेडला होणार अंत्यसंस्कार

पुणे, पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचे निधन झाले आहे. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांनी ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी साडेआठ वाजता त्यांचे निधन झाले. उद्या त्यांच्या पार्थिवावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. ते व्हेंटिलेटरवर होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. (poet, lyricist Namdeo Dhondo Mahanor passes away)

महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाल्यावर त्यांनी जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. शिक्षण सोडून ते शेती करायला गावी परतले. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो. त्यांचे अनेक कवितासंग्रह मराठी साहित्यप्रेमींच्या पसंतीस उतरले.  त्यांच्या कविता आणि गीतांमधून निसर्गाचे दर्शन घडत होते. त्यांच्या साहित्यात मराठी बोलीभाषांचा वापर पाहायला मिळाला. महानोर हे १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले होते. त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला. महानोर यांनी 'पानझड', 'तिची कहाणी', 'रानातल्या कविता' गाण्यांमधून पळसखेडची मराठवाडी लोकगीते प्रसिद्ध केली. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. एकापेक्षा एक गीतरचनांसाठीही त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. कवी, गीतकार, शेतकरी, माजी आमदार असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या महानोर यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जायचे. महानोर यांची प्रगतीशील शेतकरी म्हणूनही ओळख होती. आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं अशी एकाहून एक गाणी महानोर यांनी लिहिली. गीतकार म्हणून ना. धों. महानोर यांची 'अवेळीच केव्हा दाटला अंधार', 'आम्ही ठाकर ठाकर', 'मी रात टाकली मी कात टाकली', 'घन ओथंबून येती, नभ उतरु आलं' ही त्यांची गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.

ना. धों. महानोर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. "माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धों. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले. पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना. धों. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले.

ना. धों यांची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे, त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धों. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटुंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो." अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

ना. धों. महानोर हे गीतकार असलेले चित्रपट

चित्रपट वर्ष (इ.स.)
अबोली -१९९५
एक होता विदूषक – १९९२
जैत रे जैत – १९७७
दोघी – १९९५
मुक्ता – १९९४
सर्जा – १९८७
मालक – २०१५
ऊरुस – २००८
अजिंठा – २०११
यशवंतराव चव्हाण – २०१२

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news