मोदींनी गिरीश बापटांच्या आठवणींना दिला उजाळा | पुढारी

मोदींनी गिरीश बापटांच्या आठवणींना दिला उजाळा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या वेळी मोदींनी बापट कुटुंबीयांची विचारपूस करीत गिरीश बापट यांच्यासमवेतच्या आठवणींनाही उजाळा दिला. खासदार बापट यांचे एप्रिल महिन्यात निधन झाले. त्यामुळे मंगळवारी विविध कार्यक्रमांनिमित्त पुणे दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापट कुटुंबीयांना भेटीसाठी वेळ दिला होता. शिवाजीनगर येथील पोलिस ग्राउंडवरील कार्यक्रमानंतर बापट यांचे चिरंजीव गौरव आणि स्नुषा स्वरदा यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीत पंतप्रधानांनी आमच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली.

आईच्या तब्येतीबाबत विचारणा केली. तसेच ते जेव्हा संघ प्रचारक होते, तेव्हा त्यांनी बाबांसमवेतच्या मोतीबागेतील आठवणींना उजाळा दिला. तसेच, संसदेतील त्यांच्यासमवेतच्या आठवणीही सांगितल्या. या वेळी पुण्याचा खासदार म्हणून मिळालेले प्रतिनिधित्व तसेच काश्मीरमधील कलम 370 हटविण्यासाठी केलेले मतदान, यामुळे आपण भाग्यवान ठरल्याचे बाबा आम्हाला सांगायचे, असे आपण पंतप्रधानांना सांगितल्याचे गौरव यांनी ’पुढारी’शी बोलताना सांगितले.

गीता धर्म मंडळ
शिवाजीनगर येथील पोलिस ग्राउंड येथे झालेल्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना गीता धर्म मंडळातील पदाधिकारी भेटले. मंडळाच्या कार्यवाह विनया मेहेंदळे आणि उपाध्यक्ष मुकुंद कोंढवेकर यांनी मोदींची भेट घेत मंडळाच्या उपक्रमांबाबतची माहिती दिली. तसेच, मंडळाचा शताब्दी वर्ष महोत्सव सुरू असून, महोत्सवाच्या समोरापाच्या कार्यक्रमाचे निमंत्रणही मोदींना देण्यात आले.

हेही वाचा :

मोदींना पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी

पुणे : बंदोबस्ताच्या परीक्षेत पोलिस पास !

Back to top button